राणीच्या बागेत पाना-फुलांपासून बनली सनई, बासरी आणि गिटार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2019 01:22 AM2019-01-31T01:22:59+5:302019-01-31T01:23:15+5:30

महापालिकेचे ‘वार्षिक उद्यान प्रदर्शन; ‘संगीत आणि वाद्यां’ची संकल्पना

In the Queen's garden, clarinet, flute and guitar made from wreaths and flowers | राणीच्या बागेत पाना-फुलांपासून बनली सनई, बासरी आणि गिटार

राणीच्या बागेत पाना-फुलांपासून बनली सनई, बासरी आणि गिटार

Next

मुंबई : १२ फुटांची अवाढव्य सनई, ८ फुटांची बासरी आणि ८ फुटांचे गिटार, पाना-फुलांपासून तयार केलेल्या या प्रतिकृतींसोबत तबला, वीणा, सितार, संवादिनी यांसारख्या अनेक वाद्यांच्या प्रतिकृती मुंबईकरांच्या भेटीला येणार आहेत. निमित्त आहे ते मुंबई महापालिकेच्या ‘वार्षिक उद्यान प्रदर्शना’चे.

२०१६ सालापासून मध्यवर्ती संकल्पनेवर उद्यान प्रदर्शनी आयोजित करण्यात येते. २०१६ मध्ये ‘स्वच्छ मुंबई-सुंदर मुंबई’ ही संकल्पना घेऊन आयोजित प्रदर्शनात पाना-फुलांचा वापर स्वच्छताविषयक साहित्य व वाहनांच्या प्रतिकृती ठेवण्यात आल्या होत्या. २०१७ मध्ये कार्टुन्सच्या प्रतिकृती प्रदर्शित करून मध्यवर्ती संकल्पना साकारण्यात आली होती, तर २०१८ मध्ये जलचर मध्यवर्ती संकल्पना घेण्यात आली होती. ज्या अंतर्गत जलपरी, डॉल्फिन, स्टारफिश, ऑक्टोपस, कासव, बदक, मगर, खेकडा इत्यादींच्या प्रतिकृती पाना-फुलांपासूनच साकारण्यात आल्या होत्या.

२०१९ म्हणजे या वर्षी भायखळ्यातील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय येथे आयोजित उद्यान प्रदर्शनाची मध्यवर्ती संकल्पना ‘संगीत आणि वाद्य’ आहे. या अंतर्गत पाना-फुलांपासून तयार केलेल्या अनेक वाद्यांच्या प्रतिकृती या वर्षीच्या प्रदर्शनात बघता येणार आहेत. यासोबतच कुंड्यांमध्ये वाढविलेली फळझाडे व फुलझाडे, फळभाज्यांची झाडे, मोसमी फुलझाडे, औषधी वनस्पती, बोनसाय यांचे अक्षरश: शेकडो प्रकार मुंबईकरांना या प्रदर्शनात पाहायला मिळणार आहेत. वाद्यांच्या प्रतिकृती बघतानाच वाद्यांचे आवाज अनुभवण्याची संधी प्रदर्शनात मिळणार आहे. प्रदर्शनाच्या निमित्ताने अनेक परदेशी भाज्यांची रोपे वा झाडे बघण्याची संधी मुंबईकरांना मिळणार आहे. १ ते ३ फेब्रुवारी दरम्यान प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. उद्घाटन महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या हस्ते १ फेब्रुवारी रोजी होणार आहे.

उद्यानात अद्ययावत पिंजऱ्यांची उभारणी
मुंबई : भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयात मार्च, २०१७ मध्ये हंम्बोल्ट पेंग्विन आल्यापासून येथे भेट देणाºयांच्या संख्येत वाढ होत आहे. सध्या दररोज सुमारे १० हजार, तर सुट्टीच्या दिवशी सुमारे २० हजार नागरिक पेंग्विन कक्षासह उद्यानाला भेट देण्यासाठी येत आहेत. सध्या येथे अद्ययावत व अत्याधुनिक अशा १७ पिंजºयांची उभारणी सुरू असून, त्यात नवीन प्राणी व पक्षी यांचे आगमन लवकरच होणार आहे.
महापालिकेने पेंग्विनसाठी अनुकूल वातावरण असणारा पेंग्विन कक्ष, त्याला अनुरूप सभोवतालचा परिसर यासाठी सुमारे ४५ कोटी रुपये खर्च केला होता. या कक्षाचा वार्षिक परिरक्षण खर्च साडेतीन कोटी आहे. गेल्या दोन वर्षांत प्रवेश शुल्कापोटी महापालिकेकडे १५ कोटी रुपये आतापर्यंत जमा झाले आहेत. त्यामुळे पेंग्विन कक्ष उभारण्यासाठी व परिरक्षणासाठी महापालिकेने आतापर्यंत खर्च केलेल्या रकमेपैकी सुमारे २५ टक्के रक्कम वसूल झाली आहे.
उद्यानाच्या महसुलात लक्षणीय वाढ झाली असून, एप्रिल, २०१७ ते मार्च, २०१८ या कालावधी दरम्यान सुमारे ८ कोटी रुपयांचे उत्पन्न प्रवेश शुल्काद्वारे मिळाले आहे. चालू आर्थिक वर्षात आतापर्यंतच्या १० महिन्यांच्या कालावधीत सुमारे ७ कोटी रुपयांची प्राप्ती झाली आहे. यानुसार, गेल्या सुमारे २ वर्षांच्या कालावधीत जवळपास १५ कोटी रुपयांचा महसूल पालिकेला मिळाला आहे.

हजारो नागरिकांची भेट
उद्यान १८६२ मध्ये सुरू झाले.
प्राणिसंग्रहालय ५३ एकरांच्या विस्तीर्ण परिसरात आहे.
मार्च, २०१७ पूर्वी उद्यानाच्या प्रवेश शुल्कातून दरवर्षी ४० ते ५० लाख प्राप्त होत होते.
सार्वजनिक सुट्ट्यांच्या प्रत्येक दिवशी २० हजार नागरिक येथे येतात.
दिवाळी, नाताळसारख्या सुट्टीत येथे दररोज ३० हजार नागरिक येतात.

वन्यजीवांवर टू डी चित्रपट
मुंबई : पेंग्विन कक्षानंतर भायखळा येथील राणीबागेत आणखी एक नवीन आकर्षण बच्चेकंपनीसाठी खुले होणार आहे. वन्यजीवांवरील एका खासगी चॅनेलच्या माध्यमातून मुंबईतील पहिलाच वन्यप्राणी व पर्यावरण टू डी थिएटर प्रकल्प महापालिकेने तयार केला आहे. त्यानुसार १ फेब्रुवारीपासून मुंबईकरांना टू डी प्रणालीचे चार शो दाखविण्यात येणार आहेत. अशा प्रकारची थ्री डी सुविधा देणारे हे पहिले प्राणिसंग्रहालय ठरणार आहे.
वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयात दररोज सुमारे १५ हजारांहून अधिक शालेय विद्यार्थी पालकांसह येतात. तर सुट्ट्यांच्या दिवशी विद्यार्थ्यांची संख्या ३० हजारांहून अधिक असते. त्यामुळे या सिनेमागृहात सुमारे दोनशे आसनांची व्यवस्था करण्यात येणार आहे. हा प्रकल्प सुरू झाल्यानंतर टू डी प्रणालीचे एकूण चार शो दाखविण्यात येतील. शेवटचा शो हा सायंकाळी ५ वाजता संपणार आहे.
पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना हे शो नि:शुल्क पाहता येणार आहेत. मात्र सर्वसामान्य नागरिक व खासगी शाळेतील विद्यार्थ्यांना शुल्क आकारण्यात येईल.

असे आहेत शो...
या थ्री डी सिनेमागृहात अ‍ॅनिमल प्लॅनेटने दिलेल्या टू डी प्रणालीच्या ‘जवाई : इंडियास लेपर्ड हिल्स’, ‘आफ्रिका वाइल्ड, मिस्टीरियस वाइल्ड आॅफ इंडिया, स्पीड आॅफ लाइफ’ या जागतिक दर्जाच्या चित्रफिती प्रदर्शित करण्यात येणार आहेत. तसेच खासगी चॅनेलकडून महापालिकेस एकूण सात चित्रफिती मोफत देण्यात आल्या आहेत.

Web Title: In the Queen's garden, clarinet, flute and guitar made from wreaths and flowers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई