मुंबई : ‘स्वप्नात पाहिली राणीची बाग..हत्तीच्या पाठीवर बसलाय नाग’ या बालगीताच्या ओळी प्रत्येकाच्या स्मरणात आहे. मात्र दुर्दैवाने या ओळींमधील राणीची बाग सद्यस्थितीत ‘व्हेंटीलेटर’वर असल्याचे धक्कादायक वास्तव सर्वेक्षणातून उघडकीस आले आहे. भायखळा येथील वीरमाता जीजाबाई भोसले उद्यानाला भेट देणाऱ्या पर्यटकांशी संवाद साधून झेविअर्सच्या विद्यार्थ्यांनी या उद्यानाची भयावह स्थिती समोर आणली आहे.राणीच्या बागेतील पेंग्विनच्या मृत्यूने नुकतेच हे उद्यान चर्चेत आले होते. याच धर्तीवर एकूणच या उद्यानाची सद्यस्थिती आणि सूचनांविषयी झेविअर्स महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पर्यटकांशी संवाद साधला आहे. शिवसेनेचे नामनिर्देशित नगरसेवक आणि झेविअर्स महाविद्यालयाचे प्रा. अवकाश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प राबविण्यात आला. या सर्वेक्षणांतर्गत ३ हजार ६०० पर्यटकांशी विद्यार्थ्यांनी संवाद साधला. यात १ हजार ९४४ पुरुष आणि १ हजार ६५४ महिला पर्यटकांचा समावेश होता. यातील २८८ नोकरदार, २ हजार ४४८ विद्यार्थी, ४६८ गृहिणी आणि ३९६ अन्य व्यक्तींनी आपली मते नोंदविली. (प्रतिनिधी)
भायखळा येथील राणीची बाग ‘व्हेंटिलेटर’वर !
By admin | Published: November 18, 2016 4:21 AM