बीएसयूपीच्या सात हजार घरांचा प्रश्न मार्गी

By admin | Published: September 13, 2014 12:17 AM2014-09-13T00:17:23+5:302014-09-13T00:17:23+5:30

ठाणे महापालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून बीएसयूपी योजनेकडे पाहिले जाते. २००७ पासून सुरू झालेला प्रकल्प रखडत-रखडत आता मार्गी लागण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

Question about seven thousand houses of BSUP | बीएसयूपीच्या सात हजार घरांचा प्रश्न मार्गी

बीएसयूपीच्या सात हजार घरांचा प्रश्न मार्गी

Next

ठाणे : ठाणे महापालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून बीएसयूपी योजनेकडे पाहिले जाते. २००७ पासून सुरू झालेला प्रकल्प रखडत-रखडत आता मार्गी लागण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. स्थानिकांसह राजकीय नेत्यांच्या विरोधामुळे काही ठिकाणी हा प्रकल्पच सुरू करता आला नाही. त्यामुळे या प्रकल्पातील ९,४४६ घरांची संख्या सात हजारांवर गेली. त्यानुसार, आता या घरांचे वाटप येत्या दोन वर्षांत पूर्ण केले जाईल, असे आश्वासन पालिकेने दिले आहे. या सात हजार घरांत संक्रमण शिबिरांच्या २२०० घरांचाही समावेश आहे.
यासाठी ९ ठिकाणी डीपीआर मंजूर झाले होते. त्यानुसार, शहरात ९४४६ घरे बांधली जाणार होती. यापैकी एमएमआरडीएने तुळशीधाम येथे टप्पा-१ व २ अंतर्गत घरे उभारली. तसेच खारटन रोड, महात्मा फुलेनगर, कौसा येथेही घरे बांधली आहेत. ४ ठिकाणच्या भूखंडांवर या योजनेंतर्गत घरे उभारण्याचे पालिकेने ठरवले होते. परंतु, येथील स्थानिक राजकीय पुढाऱ्यांनी या योजनेला खो घातल्याने येथील प्रकल्पांचा नारळ फुटलाच नाही. आनंदनगर येथे ही योजना सुरू करण्यासाठी दोन वेळा निविदा काढूनही त्याला स्थानिकांचा झालेला विरोध आणि निविदांना न मिळालेला अपेक्षित प्रतिसाद यामुळे येथील योजनाही बारगळली. तसेच वर्तकनगर येथील म्हाडाच्या दोन इमारतींचादेखील बीएसयूपीमध्ये समावेश करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, तोसुद्धा फसला. काही ठिकाणी ठेकेदारांना भूखंडांचा ताबा उशिराने मिळाल्याने या योजनेचे काम वेळेत सुरू होऊ शकले नाही.
विशेष म्हणजे प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली गेली, त्या वेळेस शहरात ९४४६ घरे उभारण्याचे प्रस्तावित होते. परंतु, काही ठिकाणचे प्रकल्प रखडले आणि काही ठिकाणी उशिराने सुरू झाल्याने अखेर पालिकेने सात हजार घरे उभारण्याचे निश्चित केले. या प्रकल्पाचा एकूण खर्च सुमारे ७०० कोटींच्या घरात असल्याचेही पालिकेने स्पष्ट केले आहे. त्यानुसार, आतापर्यंत १८०० घरांचे वाटप झाले असल्याची माहिती पालिकेने दिली. आणखी दोन हजार घरे तयार असल्याची माहिती आयुक्त असीम गुप्ता यांनी दिली. सात हजार घरांपैकी २२०० संक्रमण शिबिरांची घरे असणार असून त्यांचेही काम सुरू झाले आहे. ही संक्रमण शिबिरे पडले गाव, मुंब्रा येथे सुरू असून फाउंडेशनचे काम झाले आहे. संक्रमण शिबिरांचे कामही दोन टप्प्यांत होणार असून पहिल्या टप्प्यात ११०० आणि दुसऱ्या टप्प्यात ११०० अशी २२०० घरे उभारली जाणार असून यासाठी २०० कोटींचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. विशेष म्हणजे आता पुन्हा आनंदनगर येथे पालिका घरे उभारण्याचा प्रयत्न करणार असून येथे संक्रमण शिबिरांतर्गत घरे उभारण्याचा मानस व्यक्त करण्यात आला आहे. हे काम पावसाळ्यानंतर हाती घेतले जाईल, असेही पालिकेने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, येत्या डिसेंबरअखेरपर्यंत आणखी दोन हजार घरांचे वाटप केले जाणार असून उर्वरित घरांचे वाटप पुढील वर्षात पूर्ण केले जाईल, असेही पालिकेने स्पष्ट केले. (प्रतिनिधी)

Web Title: Question about seven thousand houses of BSUP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.