मुंबई - विधान परिषदेवरील १२ राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या नियुक्तीबाबत आपण योग्य तो निर्णय घेऊ, असे आश्वासन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना दिले. या तिघांनीही सायंकाळी राज्यपालांची भेट घेऊन या नियुक्ती लवकरात लवकर करण्याची विनंती केली. या रखडलेल्या प्रश्नासंदर्भात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आले, त्यावेळी तो राज्यपाल आणि राज्य सरकारचा प्रश्न असल्याचं एका वाक्यात उत्तर त्यांनी दिलं.
मुख्यमंत्री व इतर दोन नेत्यांनी 12 आमदारांच्या प्रश्नासंदर्भात लवकरात लवकर नियुक्तीचे एक विनंती पत्रही राज्यपालांना दिले. या नियुक्तींवरून राजभवन विरुद्ध राज्य सरकार यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून तणाव असल्याचे चित्र आहे. गेल्याच आठवड्यात मुख्यमंत्री ठाकरे हे राज्यपालांना या विषयावर भेटणार होते; पण राजभवनकडे वेळच मागण्यात आलेली नव्हती, असे स्पष्ट करण्यात आले तर राज्यपालांनी भेट नाकारल्याचा आरोप काँग्रेसने केला होता, शेवटी बुधवारी ही भेट झाली.
या भेटीनंतर देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, राज्यपाल आणि राज्य सरकार या दोघांमधील हा प्रश्न आहे, असे म्हणत एका वाक्यात त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली. तसेच, या प्रश्नावर प्रतिक्रिया द्यायचा आमचं कारण नाही. त्यांनी काय यादी पाठवली, कधी यादी पाठवली हे आम्हाला माहिती नाही, नावं कुठली पाठवली हेही आम्हाला माहिती नाही. त्यामुळे, राज्यपालांसोबत त्यांची काय चर्चा झाली, हेही आम्हाला माहिती नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.
अजित पवारांनी दिली माहिती
उपमुख्यमंत्री पवार यांनी या भेटीनंतर पत्रकारांना सांगितले की, या नियुक्तींबाबत लवकर निर्णय घेण्याची विनंती तर आम्ही केलीच शिवाय राज्यातील एकूण परिस्थितीची माहिती राज्यपालांना दिली.विधान परिषदेच्या १२ जागा रिक्त राहणे सभागृहाच्या कामकाजाच्या दृष्टीनेही योग्य नाही याकडे मुख्यमंत्र्यांनी आजच्या भेटीत लक्ष वेधले. राज्यातील कोरोनाची परिस्थिती, मराठवाडा, कोकण. उत्तर महाराष्ट्रातील अलिकडच्या अतिवृष्टीबाबतही आम्ही राज्यपालांना माहिती दिली,असे पवार यांनी सांगितले.
‘त्या’ १२ आमदारांच्या निलंबनावरही झाली चर्चा
भाजपच्या १२ आमदारांना विधानसभा अधिवेशनात एक वर्षासाठी निलंबित केले होते. याबाबतचा मुद्दा राज्यपालांनी उपस्थित केल्याची माहिती आहे. आमदारांनी अभूतपूर्व गोंधळ घातला, शिवीगाळ केली त्यामुळे निलंबनाशिवाय पर्याय नव्हता, असे मुख्यमंत्री, अजित पवार आणि थोरात यांनी यावेळी स्पष्ट केल्याचे सूत्रांनी सांगितले.