सानपाड्यातील पुलाचा प्रश्न मार्गी
By Admin | Published: February 11, 2015 12:31 AM2015-02-11T00:31:58+5:302015-02-11T00:31:58+5:30
अनेक वर्षांपासून रखडलेला सानपाडा दत्तमंदिरजवळील पादचारी पुलाचा प्रश्न मार्गी लागला आहे. सानपाडा व तुर्भे नाकाजवळ पदप
नवी मुंबई : अनेक वर्षांपासून रखडलेला सानपाडा दत्तमंदिरजवळील पादचारी पुलाचा प्रश्न मार्गी लागला आहे. सानपाडा व तुर्भे नाकाजवळ पदपथ बांधणे व ऐरोली नाक्यावर भुयारी मार्ग तयार करण्याच्या प्रस्तावास सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली आहे. यामुळे परिसरातील नागरिकांची गैरसोय दूर होणार आहे.
नवी मुंबईमधील प्रमुख धार्मिक स्थळांमध्ये सानपाडामधील दत्तमंदिराचा समावेश आहे. या ठिकाणी दर्शनासाठी रोज भाविकांची गर्दी असते. गुरुवारी व दत्तजयंतीला हजारो भाविक या ठिकाणी येत असतात. येथील रेल्वे रूळावर असलेला पादचारी पूल धोकादायक बनला आहे.
सदर ठिकाणी नवीन पूल बांधण्याची मागणी दहा वर्षांपासून करण्यात येत होती. परंतु विविध कारणांमुळे हा प्रश्न रखडू लागला होता. सभागृहात हा प्रस्ताव मंजुरीसाठी येत नसल्यामुळे शिवसेनेच्या नगरसेविका कोमल वास्कर यांनी गतसभेमध्ये ठिय्या आंदोलन केले होते. अखेर सर्वसाधारण सभेत सानपाडा दत्तमंदिर, तुर्भे नाका ते जनता मार्केटजवळ पादचारी पूल उभारणे व ऐरोली नाक्यावर भुयारी मार्ग तयार करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. ११ कोटी ८ लाख रुपयांच्या प्रस्तावास सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली आहे.
सानपाडा दत्तमंदिरजवळ पादचारी पूल बांधण्यासाठी रेल्वेची ओव्हरहेड वायर स्थलांतर करावी लागणार आहे. यासाठी रेल्वेला ९४ लाख १४ हजार रुपये भरावे लागणार असून सदर खर्चासही सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली आहे. यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न अखेर मार्गी लागला असून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.