मुंबई, दि. 4 - धनगर समाजाच्या आरक्षणाचा अहवाल तात्काळ देण्यात यावा या मागणीसाठी यशवंत सेनेच्या वतीने मुंबई येथे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोसिएल सायन्स मुख्य कार्यालय देवनार डेपो येथे तीव्र आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला मोठ्या संख्येने महाराष्ट्र भरातून धनगर समाज बांधव उपस्थित होते. भाजप सरकारमधील नेते,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की आमची सत्ता आल्यानंतर पहिल्या कॅबिनेट बैठकीत आरक्षण प्रश्न सोडवला जाईल परंतु आज तीन वर्षे उलटली आहेत तरीही आरक्षण प्रश्न निकाली निघालेला नाही.
आरक्षणाचा अभ्यास चालू आहे आणि याचा अभ्यास करण्यासाठी टीस या संस्थेला काम दिले आहे . आमच्या मताचा वापर सत्तेसाठी केला आहे परंतु येणाऱ्या काळात हाच धनगर समाज भाजपला सत्तेवरून खेचण्याचे काम करेल असे यशवंत सेनेचे अध्यक्ष भारत सोन्नर म्हणाले. आंदोलकांनी तीव्र स्वरूपाचे आंदोलन केल्यानंतर लेखी स्वरूपात टीसच्या संचालकांनी 31 डिसेंबर 2017 पर्यंत शासनाला अहवाल देण्यात येईल असे लेखी आश्वासन आंदोलकांना दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
समाजबांधव आपल्या पारंपरिक वेशभूषेत व घोंगड्या काट्या ढोल घेऊऩ आले होते. यावेळी पारंपरिक नृत्य टीस कार्यालयासमोर करण्यात आले याप्रसंगी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठ्या प्रमाणात पोलीस दल तैनात करण्यात आले होते. आरक्षण तात्काळ लागू करा नाहीतर, यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही यशवंत सेनेने दिला.