मलबार हिलवरील बंगल्याच्या पुनर्विकासापुढे आले प्रश्नचिन्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 02:32 AM2018-10-23T02:32:04+5:302018-10-23T02:32:10+5:30
मुंबईत मलबार हिल या अतिश्रीमंत वस्तीतील ‘व्हिला निर्मला’ हा ७० वर्षांचा एक जुना दोन मजली बंगला पाडून तेथे सुमारे ७० मीटर उंचीची २४ मजली टोलेजंग इमारत बांधण्याच्या सध्या सुरु असलेल्या कामापुढे उच्च न्यायालायने प्रश्नचिन्ह उभे केले आहे.
मुंबई : मुंबईत मलबार हिल या अतिश्रीमंत वस्तीतील ‘व्हिला निर्मला’ हा ७० वर्षांचा एक जुना दोन मजली बंगला पाडून तेथे सुमारे ७० मीटर उंचीची २४ मजली टोलेजंग इमारत बांधण्याच्या सध्या सुरु असलेल्या कामापुढे उच्च न्यायालायने प्रश्नचिन्ह उभे केले आहे. हे बांधकाम न्यायालयाने थांबविले नसले किंवा त्यासाठी दिलेली परवानगी रद्द केली नसली तरी महापालिका व ‘म्हाडा’ने या प्रस्तावाचा फेरविचार करून नव्याने निर्णय घ्यावा, असा आदेश दिला आहे.
मे. आर. ए. रिअॅलिटी व्हेंचर या विकासकाकडून सुरु असलेले हे काम निम्मेअधिक पूर्ण होत आले आहे. ते काम सुरु ठेवता येईल. मात्र ते यानंतर होणाऱ्या फेरनिर्णयाच्या अधीन राहून असेल, असे न्यायालायने स्पष्ट केले. हा फेरनिर्णय १० आठवड्यांत करायचा आहे.
नॉर्मंडी को.आॅप. हौसिंग सोसायटी व प्रकाश पटेल, दिलनार चिकगार आणि ज्योत्स्ना नेवटिया यांनी केलेल्या जनहित याचिकेवर न्या. शांतनू केमकर व न्या. नितिन व्ही. सांबरे यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला. विकासकाने सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी वेळ मागितल्याने निकालातील फेरविचाराचा भाग चार आठवड्यांसाठी तहकूब ठेवला गेला.
पूर्वी हा बंगला बडोदा संस्थानच्या राजघराण्यातील श्रीमंत कुमार खंडेराव शिवाजीराव गायकवाड यांच्या मालकीचा होता. नंतर त्यांनी तो नित्यानंद मंगेश वागळे व
तरु जेठमल लालवाणी या
भाडेकरुंना मालकीहक्काने विकला. या दोघांनी आपले भाडकरुचे
हक्क कासिमपुरिया व भालगाट
यांना हस्तांतरित केले. त्याआधारे विकासकाने डीसी रूल ३३(७)
अन्वये पुनर्विकासाची परवानगी
व वाढीव ‘एफएसआय’
मिळविला.
>परवानगीमधील शंकास्थळे
न्यायालयाने या परावनगी प्रक्रियेत ज्या मुद्द्यांवर साकल्याने विचार न झाल्याचे मत नोंदविले त्यातील काही असे-
मुळात ही वास्तू १९४० पूर्वी बांधलेली व ‘सेस’ लागू असलेली होती का?
वास्तूत कोणी भाडेकरू नसताना व त्यांनी सहकारी सोसायटी स्थापन केलेली नसताना ३३(७) लागू होते का?
ही वास्तू एस. के. बडोदावाला मार्गावर आहे, असे गृहित धरून ६९.९५ मीटर उंचीची परवानगी दिली गेली. वास्तवात ती एम. एल. डहाणूकर मार्गावर आहे. या रस्त्याची रुंदी फूटपाथसह जेमतेम १२ मीटर असल्याने डीसी रुल ३१ अन्वये एवढी उंची मंजूर करता येऊ शकत नाही.