दहावी, बारावीच्या नियोजित परीक्षांवर प्रश्नचिन्ह !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:04 AM2021-04-06T04:04:57+5:302021-04-06T04:04:57+5:30
मॅरेथॉन बैठका सुरू; शिक्षण विभागाकडून येत्या तीन दिवसांत निर्णयाची अपेक्षा लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर ...
मॅरेथॉन बैठका सुरू; शिक्षण विभागाकडून येत्या तीन दिवसांत निर्णयाची अपेक्षा
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्यात सोमवार ते शुक्रवार कडक निर्बंध आणि शनिवार, रविवारी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. शाळा, महाविद्यालये आणि खासगी कोचिंग क्लासेस बंद ठेवण्याचा निर्णयही कायम ठेवण्यात आला आहे. मात्र दहावी, बारावीच्या नियाेजित ऑफलाइन परीक्षांबाबत काय, असा संभ्रम विद्यार्थी, पालकांमध्ये आहे. दरम्यान, या परीक्षांसंदर्भातील निर्णय येत्या ३ ते ४ दिवसांत जाहीर करण्यात येईल, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले.
दहावी, बारावी बाेर्डाची परीक्षा देणारे राज्यभरातील ३० लाख विद्यार्थी आहेत. वाढत्या काेराेनाच्या पार्श्वभूमीवर या परीक्षांचे आयाेजन कसे करायचे, यासंदर्भात वर्षा गायकवाड यांनी सोमवारी महत्त्वपूर्ण बैठक घेतली. याच विषयावर अधिक चर्चेसाठी आणखी काही बैठका होणार असून या बैठकांना शिक्षण मंडळाचे विविध अधिकारी उपस्थित राहतील. शनिवार, रविवारी पूर्ण लॉकडाऊन घोषित झाल्यामुळे शनिवारी होणाऱ्या पेपरचे काय, त्याचे नियाेजन करायचे, की परीक्षा पुढे ढकलायच्या? बोर्डाच्या परीक्षांना हजर राहणाऱ्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, पर्यवेक्षकांच्या लसीकरणाचे काय? वाढता संसर्ग पाहता विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी कोणत्या उपाययोजना केंद्रावर करणे गरजेचे आहे? याचे कसे नियोजन करायचे, अशा सर्व महत्त्वपूर्ण विषयांवर या बैठकांमध्ये चर्चा होणार असल्याचे समजते.
* दहावी, बारावीच्या परीक्षांचे यापूर्वी जाहीर झालेले नियोजन
दहावी, बारावी बाेर्डाच्या परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार ऑफलाइन होतील. विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये, त्यांच्या आरोग्याची, सुरक्षिततेची काळजी घेता यावी म्हणून यंदा त्यांच्याच शाळा, महाविद्यालयांत परीक्षेचे केंद्र असेल. विद्यार्थ्यांमध्ये योग्य सामाजिक अंतर राखून लेखी परीक्षेसाठी यंदा अर्ध्या तासाची वेळ वाढवून देण्यात आली आहे. संसर्ग किंवा इतर कोणत्याही कारणास्तव परीक्षा देता न आल्यास जूनमधील विशेष परीक्षेची संधी विद्यार्थ्यांना मिळू शकेल.
* राज्यातील परीक्षांची सद्य:स्थिती
-पहिली ते आठवी सर्व परीक्षा रद्द - वर्गाेन्नतीने थेट पुढच्या वर्षात प्रवेश. वर्गोन्नतीच्या मार्गदर्शक सूचना एससीईआरटी करणार जाहीर
- नववी व अकरावी - लवकरच निर्णय अपेक्षित
- दहावीच्या लेखी परीक्षा - २९ एप्रिल ते २० मे
-बारावीच्या लेखी परीक्षा - २३ एप्रिल ते २१ मे
...........................................................