मुंबई : दादर, शिवाजी पार्क येथील महापौर निवासस्थान शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी दिल्यामुळे महापौर निवासस्थान स्थलांतरित करण्यात येणार आहे. मात्र गेले अनेक महिने यावर चर्चा सुरू असून अंतिम निर्णय झालेला नाही. त्यामुळे महापौरांच्या पर्यायी निवासस्थानाबाबत पालिका प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा अन्यथा आयुक्त कार्यालयासमोर धरणे धरू, असा इशारा शिवसेना नगरसेवकांनी आज सुधार समितीमध्ये प्रशासनाला दिला. यासाठी प्रशासनाला एक महिन्याची मुदत देण्यात आली आहे.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक शिवाजी पार्क येथील महापौर बंगल्यात होणार आहे. याबाबतची सर्व प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. मात्र महापौरांच्या पर्यायी निवासस्थानाबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. याबाबत माजी महापौर विशाखा राऊत यांनी सुधार समितीमध्ये आज हरकतीचा मुद्दा उपस्थित केला. महापौर निवासस्थानासाठी शिवसेनेने मलबार हिल येथील पाणी खात्याच्या बंगल्याचा पर्याय सुचवला होता. मात्र माजी अतिरिक्त आयुक्त डॉ. पल्लवी दराडे यांनी अद्याप तो बंगला रिकामा केलेला नाही.याबाबत प्रशासनाने राज्य सरकारला पत्र लिहिले असता पालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल हे राज्य सरकारच्या बंगल्यात राहत असल्याने दराडे दाम्पत्याला हटवण्याबाबत पुन्हा पुन्हा सांगू नये, असे उत्तर राज्य सरकारतर्फे देण्यात आले होते.यावर प्रशासनाने तातडीने तोडगा काढावा, अशी मागणी राऊत यांनी केली. निवासस्थान न मिळाल्यास विद्यमान महापौर विश्वनाथ महाडेश्वर हे आपल्या घरी राहायलाजातील. त्यामुळे महिन्याभरात महापौरांसाठी पर्यायी घर शोधा, असा इशाराच शिवसेना नगरसेवकांनी दिला.
महापौर निवासस्थानाचा प्रश्न अनुत्तरित!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 2:45 AM