- लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अतिरिक्त आयुक्तांचे निवासस्थान असलेल्या मलबार हिल येथील पालिकेच्या बंगल्यात स्थलांतरित होण्याची इच्छा विद्यमान महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी दर्शवली आहे. यामुळे राणीच्या बागेत प्रस्तावित महापौर बंगल्याच्या डागडुजीसाठी मागवण्यात येणाऱ्या निविदेची प्रक्रिया महापालिका प्रशासनाने तत्काळ थांबवली आहे. योगायोगाने महापौरांनी मागणी केलेल्या बंगल्यापैकी एक असलेले अतिरिक्त आयुक्त पल्लवी दराडे यांचे निवासस्थान त्यांच्या बदलीमुळे रिकामे होत आहे. मात्र तो परिसरही संवेदनशील असल्याने महापौरांच्या नव्या निवासस्थानाचा शोध जवळपास थंडावलाच आहे. यामुळे महापौर निवासस्थानाचा प्रश्न महापौर निवडणुकीच्या तीन महिन्यांनंतरही अनुत्तरितच आहे.दादर, शिवाजी पार्क येथील महापौर बंगला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी देण्यात येणार आहे. यामुळे मुंबईच्या महापौरांचे नवीन निवासस्थान भायखळा येथील राणीच्या बागेत हलवण्यात येणार होते. मात्र महाडेश्वर यांनी या प्रस्तावाचा विरोध करीत पालिका आयुक्तांचे व मलबार हिल येथील अतिरिक्त आयुक्तांचे निवासस्थान देण्याची मागणी केली होती. मलबार हिलमध्ये उच्चभ्रू वस्ती असल्याने तसेच ते वाहतुकीच्या दृष्टीनेही सोयीचे नसल्याने महापौर सर्वसामान्यांच्या आऊट आॅफ रीच जाण्याची भीती व्यक्त होत आहे. तरीही महापौर महाडेश्वर हे काही हट्ट सोडण्यास तयार नसून आपली अनिच्छा त्यांनी पालिका प्रशासनाला तोंडी कळवली आहे.राणीच्या बागेत प्रस्तावित महापौर निवासस्थानाची दुरुस्ती करण्यात येणार होती. महापौरांच्या मागणीनुसार या बंगल्याचे काम केले जाणार होते. राणीबागेचा परिसर शांतता क्षेत्रात येत असून महापौरांच्या निवासस्थानावर मात्र सतत लोकांची वर्दळ व विविध कार्यक्रम असतात. यामुळे बंगल्याच्या परिसरात आवाजाचे प्रदूषण रोखणारे यंत्र बसवण्यात येणार होते. मात्र महापौर महाडेश्वर यांच्या नकारामुळे राणीबागेत प्रस्तावित नवीन महापौर निवासस्थानाची प्रक्रिया थांबविण्यात आली आहे. या बंगल्याची दुरुस्ती जून महिन्यात पूर्ण होणे अपेक्षित होते. त्याऐवजी आता पावसाळ्यानंतरच या बंगल्याच्या डागडुजीला सुरुवात होणार आहे. तर मलबार जलाशयाच्या जवळ असल्याने संवेदनशील क्षेत्रात असलेल्या मलबार हिल येथील अतिरिक्त आयुक्तांच्या बंगल्यात महापौरांचे निवासस्थान देण्यास अधिकाऱ्यांनी असमर्थता दर्शवली आहे. अधिकाऱ्यांचा दावाराणीबाग शांतता क्षेत्रात असल्याने त्या ठिकाणी भविष्यात होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाची मात्रा कमी करण्यासाठी यंत्र बसवण्याची तयारी पालिकेने केली आहे. तसेच या बंगल्याची मोठे दुरुस्ती प्रस्तावित असून महापौरांच्या मागणीनुसार त्यात बदलही होणार होते. मात्र विद्यमान महापौर तयार नसल्याने या बंगल्याच्या दुरुस्तीसाठी मागवण्यात येणाऱ्या निविदेची प्रक्रिया थांबवण्यात आली. राणीबागच महापौर निवासस्थानासाठी उत्तमशिवाजी पार्कमध्ये बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक तयार करण्याचा निर्णय राज्य सरकारचा होता. मात्र दादर येथील महापौर निवासस्थानासाठी आरक्षित या बंगल्याचे आरक्षण बदलण्यास आणखी काही महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यानंतर मात्र महापौर महाडेश्वर यांना भायखळ्यातील बंगल्यात स्थलांतरित व्हावे लागणार अथवा उपनगरातील एखादी जागा निवडावी लागणार आहे, असे अधिकारी खासगीत सांगत आहेत.राणीच्या बागेत बंगला यासाठी नकोमहापौरांना भेटण्यासाठी शेकडो नागरिक निवासस्थानी येत असतात. तसेच अनेक सामाजिक उपक्रम व कार्यक्रमही महापौर बंगल्यात होत असतात. मात्र राणीची बाग ही शांतता क्षेत्रात गणली जाते. त्यामुळे महापौर निवासस्थानावरील वर्दळीचा राणीबागेतील प्राण्यांना त्रास होईल. सायंकाळी ६ नंतर आवाजास प्रतिबंध आहे. मात्र कार्यक्रमानिमित्त ध्वनिक्षेपक लावणे अपरिहार्य आहे. परंतु प्राण्यांना त्याचा त्रास व महापौरांवर टीका होईल.राणीबागेतील जागा तुलनात्मकदृष्ट्या अपुरी व गैरसोयीची असल्याने महापौर बंगल्यावर येणाऱ्या पाहुण्यांचे आदरातिथ्य करण्यात कमतरता राहील.