मुंबई : विरोधात असताना गिरणी कामगारांच्या प्रश्नांवर सत्ताधाऱ्यांना धारेवर धरणाऱ्या मुख्यमंत्र्यांना आता कामगारांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी वेळ नसल्याचा आरोप गिरणी कामगार संघटनांकडून होऊ लागला आहे. कामगारांच्या विविध मागण्यांवर चर्चा करण्यासाठी कामगार संघटनांनी मुख्यमंत्र्यांकडे वेळ मागितल्यानंतरही त्यांना वेळ मिळत नसल्याने कामगार संघटना आक्रमक झाल्या आहेत. संघटनांना चर्चेसाठी वेळ न दिल्यास दिवाळीपूर्वी महामोर्चा काढण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.वर्षाअखेरीस १0 हजार घरे गिरणी कामगारांना वितरित करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. परंतु या घरांच्या किमती किती असणार, उर्वरित कामगारांना कधी घरे मिळणार अशा विविध प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करण्यासाठी गिरणी कामगार संघटनांकडून वेळ मागण्यात येत आहे. बैठकीसाठी मुख्यमंत्र्यांची वेळ मिळावी यासाठी कामगार संघटनांकडून त्यांच्या कार्यालयात पाठपुरावा सुरू आहे. मात्र, अद्यापही मुख्यमंत्र्यांनी चर्चेसाठी वेळ दिलेला नाही.गिरणी कामगारांचा कळवळा दाखविणाऱ्या सत्ताधाऱ्यांना चर्चेसाठी वेळ नसल्याने कामगार संघटना आक्रमक झाल्या आहेत. मुख्यमंत्री चर्चेसाठी वेळ देत नसल्याने दिवाळीपूर्वी मंत्रालयावर महामोर्चा काढण्याचा इशारा गिरणी कामगार संघर्ष समितीचे सरचिटणीस प्रवीण घाग यांनी दिला आहे. त्यानंतरही प्रश्न मार्गी न लागल्यास येत्या हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढण्याचा इशाराही घाग यांनी दिला आहे.
गिरणी कामगारांचे प्रश्न अधांतरीच
By admin | Published: October 20, 2015 2:32 AM