Join us  

Sanjay Raut: संजय राऊतांवरील प्रश्न, खा. उदयनराजेंनी एका वाक्यातच विषय संपवला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2022 7:24 PM

महाराष्ट्रात आणि देशात राज्यातल्या शिवसेना बंडांवरुन आणि सत्तांतरावरुन राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे

मुंबई - शिवसेना पक्षात मोठी फूट पडल्यानंतर राज्यात सत्तांतर पाहायला मिळालं. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री बनले तर देवेंद्र फडणवीस यांनी अनपेक्षितपणे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर, आता 12 शिवसेना खासदारांचाही गट एकनाथ शिंदे गटात सहभागी होत आहे. राजधानी दिल्लीत आज एकनाथ शिंदेंनी 12 खासदारांची भेट घेतली. शिवसेनेतील बंडाच्या या राजकीय घडामोडीत खासदार संजय राऊत हे केंद्रस्थानी आहेत. कारण, शिवसेना आमदारांनी फुटल्यानंतर भूमिका मांडताना संजय राऊत यांनी लक्ष्य केलं. आता, खासदार उदयनराजे भोसलेंनीही संजय राऊतांवर एका वाक्यात प्रतिक्रिया दिली. 

महाराष्ट्रात आणि देशात राज्यातल्या शिवसेना बंडांवरुन आणि सत्तांतरावरुन राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. शिवसेना विरुद्ध शिवसेना असं आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण पाहण्यास मिळतं आहे. त्यात, शिवसेनेकडून संजय राऊत एकटे खिंड लढवत आहेत. तर, शिंदे गटाकडून अनेकजण संजय राऊतांवर आरोप करत आहेत. संजय राऊत यांनी केलेल्या प्रक्षोभक भाषणामुळेच, त्यांनी केलेल्या टिकेमुळेच हे 51 आमदार शिंदेगटात कायम राहिले आणि सरकार बनले, असे शिवसेना नेते रामदास कदम यांनी म्हटलं आहे. दरम्यान, आजही संजय राऊत शिंदे गटावर त्यांच्यास्टाईलने हल्लाबोल करत आहेत. यासंदर्भात आज खासदार उदयनराजे भोसले यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर, एकाच वाक्यात त्यांनी विषय मिटवला. संजय राऊत यांच्यावर बोलणे त्यांनी टाळले. 

संजय राऊत हे देव आहेत, त्यांच्याबद्दल मला प्रश्न विचारू नका. माझा दिवस चांगला जाऊ द्या, असे म्हणत उदयनराजेंनी संजय राऊतांवर अप्रत्यक्षपणे उपहासात्मक टिका केली. दरम्यान, यापूर्वीही संजय राऊत आणि उदयनराजे यांच्या अप्रत्यक्षपणे वाद पाहायला मिळाला आहे. राऊत यांनी शिवाजी महाराजांच्या वारसांनी पुरावे द्यावेत, असे म्हटले होते. तेव्हापासून उदयनराजे आणि संजय राऊत यांच्या शीतयुद्ध दिसून येत आहे. तर, शिवेंद्रराजे भोसले यांच्यावर संजय राऊत यांनी टीका केल्यानंतर उदयनराजेंनी राऊतांवर निशाणा साधला होता. कोण संजय राऊत मी ओळखत नाही असे म्हणत उदयनराजेंनी आपली कॉलर उडवली होती. 

संभाजीराजेंच्या राज्यसभेचा विषय हा शिवसेना आणि त्यांच्यातला आहे. इतर कुणीही त्यात चोंबडेपणा करू नये. भाजपला एवढं वाटत होतं तर त्यांनी संभाजीराजेंना ४२ मतं द्यायला हवी होती असं म्हणत संजय राऊत यांनी टीका केली होती. यानंतर साताऱ्यातल्या महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील याला बक्षीस देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात उदयनराजेंनी संजय राऊत यांच्यावर टीका केली.

 

टॅग्स :संजय राऊतशिवसेनाउदयनराजे भोसले