'फायनॅन्शिअल मॅनेजमेंट'ऐवजी 'फायनान्शिअल अकाऊंट'ची प्रश्नपत्रिका, परीक्षा रद्द करण्याची नामुष्की

By रेश्मा शिवडेकर | Published: January 23, 2024 03:19 PM2024-01-23T15:19:23+5:302024-01-23T15:20:00+5:30

'आयडॉल'च्या 'एमएमएस' परीक्षेतील घोळ

Question paper of Financial Account instead of Financial Management no excuse for cancellation of exam | 'फायनॅन्शिअल मॅनेजमेंट'ऐवजी 'फायनान्शिअल अकाऊंट'ची प्रश्नपत्रिका, परीक्षा रद्द करण्याची नामुष्की

'फायनॅन्शिअल मॅनेजमेंट'ऐवजी 'फायनान्शिअल अकाऊंट'ची प्रश्नपत्रिका, परीक्षा रद्द करण्याची नामुष्की

मुंबई : मुंबई विद्यापीठ 'दूरस्थ शिक्षण विभागा'च्या (आयडॉल) प्रथम वर्ष पदव्युत्तर व्यवस्थापन अभ्यासक्रमाच्या (एमएमएस) मंगळवारी झालेल्या सत्र दोन परीक्षेत 'फायनॅन्शिअल मॅनेजमेंट' या विषयाऐवजी 'फायनान्शिअल अकाऊंट'ची प्रश्नपत्रिका देण्यात आल्याने विद्यार्थ्यांना मनस्ताप झाला. 'फायनॅन्शिअल मॅनेजमेंट' या विषयाची प्रश्नपत्रिकाच नसल्याने परीक्षा रद्द करण्याची नामुष्की विद्यापीठावर आली. 

प्रश्नपत्रिकेबाबत घोळ झाल्यास पर्यायी प्रश्नपत्रिका पुरवली जाते आणि परीक्षा घेतली जाते. परीक्षा रद्द करण्याची वेळ शक्यतो येत नाही. मात्र, ही परीक्षा थेट रद्दच करण्यात आल्याने विद्यार्थ्यांच्या मनस्तापात भर पडली आहे. 'दूरस्थ शिक्षण विभागात शिक्षण घेणारे विद्यार्थी आपला नोकरीधंदा सांभाळून शिक्षण घेत असतात. त्यांना परीक्षेकरिता वारंवार सुट्ट्या घेणे कठीण जाते. त्यांना या प्रकारचा मनस्ताप देणे योग्य नाही,' अशी प्रतिक्रिया युवा सेनेचे कार्यकर्ते आणि विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे माजी सदस्य प्रदीप सावंत यांनी केली. 

परीक्षेतील गोंधळानंतर विद्यार्थ्यांनी युवासेनेचे प्रदीप सावंत आणि राजन कोळंबेकर यांच्याशी संपर्क साधला. विद्यार्थ्यांना झालेल्या या मनस्तापाकडे लक्ष वेधत युवा सेनेने या प्रकाराला जबाबदार असलेल्यांवर कारवाईची मागणी कुलगुरू डॉ. रविंद्र कुळकर्णी यांना पत्र लिहून केली आहे.

कारवाई करा
परीक्षा घेण्यापूर्वी प्रत्येक विषयाच्या तीन प्रश्नपत्रिका तयार असतात. परंतु मंगळवारी झालेल्या परीक्षेकरिता या नियमाचे पालन करण्यात आले नव्हते. पर्यायी प्रश्नपत्रिका असत्या तर परीक्षा रद्द करण्याची वेळ ओढवली नसती. या भोंगळ कारभाराला जे शिक्षक, अधिकाऱी जबाबदार आहेत, त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी.
राजन कोळंबेकर

Web Title: Question paper of Financial Account instead of Financial Management no excuse for cancellation of exam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.