मुंबई : अंधेरीमधील पेपरगळती प्रकरणात मुंब्य्रातील किड्स पॅराडाईज शाळेच्या मुख्याध्यापिकेच्या चौकशीत अनेक खळबळजनक खुलासे होत आहेत. यात नियम मोडून वेळेच्या आधीच प्रश्नपत्रिकाचे ‘सील’ उघडले जात असल्याचे समोर आले आहे. तसेच परीक्षेच्या वेळी नेमलेल्या पाच पर्यवेक्षकां अनभिज्ञ असल्याचेही मुख्याध्यापिकेने सांगितले.झाकिया मोहम्मद हुसेन शेख या ‘किड्स पॅरेडाईज’ शाळेच्या मुख्याध्यापिकेची तपास अधिकारी दया नायक यांनी तीन तास कसून चौकशी केली. शेख या सकाळी सव्वानऊ वाजताच प्रश्नपत्रिकांचा गठ्ठा उघडत असल्याचे उघड झाले आहे. नियमांनुसार हा गठ्ठा दोन साक्षीदारांसमोर त्यांच्या स्वाक्षरीसह पावणेअकरा वाजता उघडायला हवा. शेख यांचा नवरा प्रश्नपत्रिका आणण्यासाठी रिक्षाने जायचा. त्याला नियुक्तीपत्र दिल्याचे त्यांनी सांगितले होते. परीक्षेच्या दरम्यान पाच पर्यवेक्षक शाळेत ठेवण्यात आले होते. त्या पाच जणांना शाळेचा उपमुख्याध्यापक फिरोज खान याने आणले होते. मात्र त्यांच्याबाबतही काहीच माहिती यांच्याकडे नाही. ‘झाकिया शेख यांचा प्रत्यक्ष पेपरफुटीमध्ये सहभाग असल्याचे अद्याप उघड झाले नाही. मात्र परीक्षेच्या एकंदर प्रक्रियेमध्ये अनेक त्रुटी आहेत’, असे तपास अधिकारी दया नायक यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.दरम्यान, साकीनाका पोलिसांनी ज्या विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले होते; त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे. तसेच साकीनाका पोलिसांनी अटक केलेल्या फिरोज अन्सारी (४२) आणि मझमिल काझी (३२) या शिक्षकांच्या पोलीस कोठडी ३१ मार्चपर्यंत वाढविण्यात आली आहे.
वेळेआधीच उघडल्या जायच्या प्रश्नपत्रिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 1:37 AM