परीक्षेनंतर ३ दिवसांत ऑनलाइन गुण अपलोड करण्याच्या सूचना
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पारंपरिक अभ्यासक्रम म्हणजेच कला, वाणिज्य, विज्ञान यांच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या सत्र २ व सत्र ४ (नियमित व बॅकलॉग) परीक्षांसाठी तसेच अभियांत्रिकी, औषधनिर्माण, व्यवस्थापन आदी अभ्यासक्रमांच्या पदव्युत्तर पदवी परीक्षांसाठी मुंबई विद्यापीठ पहिल्यांदाच विद्यार्थ्यांना प्रश्नपेढी उपलब्ध करून देणार आहे. याचा वापर करून महाविद्यालयांनी आपल्या स्तरावर विद्यापीठाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार परीक्षा घ्याव्यात, अशा सूचना महाविद्यालयांना केल्या आहेत. विशेष म्हणजे परीक्षा संपल्यानंतर ३ दिवसांच्या आत परीक्षांचे गुण ऑनलाइन पद्धतीने विद्यापीठाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात यावेत, अशाही सूचना विद्यापीठाने दिल्या आहेत.
मुंबई विद्यापीठ आणि संलग्न सर्व महाविद्यालयांमधील २०२०-२१ च्या उन्हाळी परीक्षांच्या आयोजनासंदर्भात विद्यापीठाने परिपत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार कला, वाणिज्य, विज्ञान शाखांच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षा सत्र १ आणि सत्र ३ (बॅकलॉग) परीक्षा २५ मे ते ५ जून २०२१ या कालावधीत घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने परीक्षांसंदर्भातील निर्णय घेतला आहे. महाविद्यालयांना ऑनलाइन थिअरी परीक्षेचे वेळापत्रक विद्यापीठाने जारी केले आहे. त्यानुसार कार्यवाही करावी, अशा सूचना महाविद्यालयांना देण्यात आल्या आहेत.
* अशा हाेणार परीक्षा
बीई - १ जून ते ५ ऑगस्ट - (सेमिस्टर २, ३, ४, ५, ६ आणि १ (रिपीटर)
एमई - २२ एप्रिल ते ५ ऑगस्ट - (सेमिस्टर १, २)
बीफार्म - २४ एप्रिल ते ५ ऑगस्ट - (सेमिस्टर १ ते ८)
एमफार्म - २४ एप्रिल ते २८ जुलै - (सेमिस्टर १, २)
बीआर्क - ३ मे ते २० ऑगस्ट - (सेमिस्टर १, २, ४, ६, ८, १०)
बीएड, बीपीएड - २० एप्रिल ते २७ मे - (सेमिस्टर १, ३, ४)
एमएड, एमपीएड - २० मे ते २७ मे (सेमिस्टर १, ३, ४)
एलएलबी ३ - २ मे ते १४ जून (सेमिस्टर १, ३, ४, ५, ६)
एलएलबी ५ - २ मे ते १४ जून (सेमिस्टर १, ३, ४, ५, ६, ७, ८, ९, १०)
एलएलएम - १० मे ते १७ मे (सेमिस्टर १, ३ (रिपीटर)
बीएफए - २७ मे (सेमिस्टर १)
एमसीए ३ वर्षे - १३ मे (सेमिस्टर १, २, ३, ४, ५)
एमसीए २ वर्षे - २२ एप्रिल - (सेमिस्टर १)