राम मंदिराचा प्रश्न सुटला; भाजपा- शिवसेनेचाही लवकरच सुटेल: सुधीर मुनगंटीवार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2019 09:52 PM2019-11-09T21:52:44+5:302019-11-09T21:58:21+5:30
दीर्घकाळापासून प्रलंबित असलेला आयोध्यातील राम मंदिराचा प्रश्न आज सुटला आहे.
मुंबई: राज्यातल्या विधानसभा निवडणुकीनंतर सत्तास्थापनेसाठी भाजपा आणि शिवसेनेत चढाओढ सुरु आहे. त्यातच आज राज्यपालांनी निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपाला 11 नोव्हेंबरला सत्तास्थापनेसाठी आमंत्रित केलं आहे. यानंतर पुन्हा भाजपा- शिवसेनेच्या नेताच्या हालचालींना पुन्हा वेग आला आहे. त्यातच दीर्घकाळापासून प्रलंबित असलेला आयोध्यातील राम मंदिराचा प्रश्न आज सुटला आहे. त्याचप्रमाणे भाजपा- शिवसेनेचा प्रश्न देखील लवकरच सुटेल असा विश्वास भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे.
सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, राज्यातील निवडणुका आम्ही महायुतीच्या माध्यमातून लढवल्याने जनतेनं देखील महायुतीला कौल दिला आहे. त्यामुळे शिवसेनेनं आग्रही भूमिका सोडून जनतेने दिलेल्या कौलचा आदर करावा अशी आमची अपेक्षा आहे. शिवसेना आणि भाजपामध्ये काहीजण भांडण लावण्याचा प्रयत्न करत असून शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी हे ओळखायला हवं असं मत सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केलं आहे.
राज्यपालांनी भाजपाला सर्वाधिक जागा मिळाल्याने पहिल्यांदा सत्तास्थापनेचे निमंत्रण दिले आहे. याबाबतचे पत्र त्यांनी पाठविले आहे. हे पत्र मिळाल्यानंतर भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक होईल. यामध्ये निर्णय घेतला जाईल, असे सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. सत्ता स्थापन करायची की नाही याबाबत उद्या निर्णय घेण्यात येणार आहे. अद्याप पत्र मिळालेल्याचे आपल्याला माहिती नाही. मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झालेली नाही. महायुतीला बहुमत आहे. आता शिवसेनेने ठरवायचे आहे, असेही मुनगंटीवार यांनी एका वृत्तवाहिनीला सांगितले.
भाजपा- शिवसेनेत जुंपली
अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद आणि अधिकारपदांच्या समसमान वाटपांच्या मुद्यांवरून भाजपा आणि शिवसेना यांच्यातील युतीमध्ये तिढा निर्माण झाला आहे. दरम्यान, प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावरून शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्याला उद्धव ठाकरे यांनी काही वेळातच प्रत्युत्तर दिले आहे.
अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाच्या आश्वासनाबाबतही फडणवीस यांनी मोठा गौप्यस्फोट केला. ''अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाबाबत म्हणाल तर अशाप्रकारचा कुठलाही मुद्दा माझ्यासमोर चर्चिला गेला नव्हता. तसेच युतीची घोषणा करतानाही याबाबत कुठलाही निर्णय झाला नव्हता. कदाचित उद्धव ठाकरे आणि अमित शाह यांच्यात झालेल्या चर्चेमध्ये असे आश्वासन दिले गेले असावे, असे आम्हाला वाटले. म्हणून अमित शाह यांच्याकडे याबाबत विचारणा केली. मात्र त्यांनीही अशाप्रकारचे आश्वासन दिले नसल्याचे सांगितले.'' असे मुख्यमंत्री म्हणाले होते.
'पहिल्यांदाच शिवसेना प्रमुख्यांच्या कुटुंबावर खोटारडेपणाचा आरोप झाला आहे. जनता पुरेपूर ओळखून आहे खरे कोण बोलतो आणि खोटे कोण? आमच्यात काय ठरले होते. मी दिल्लीला गेलो नव्हतो. अमित शहा आले होते. फोनवर चर्चेवेळी त्यांनी सांगितले की, तुम्हाला लोकसभेला युतीच्या बदल्यात उपमुख्यमंत्रीपद मिळेल. मी त्यांना सांगितले की त्यासाठी मी लाचार नाही. मी माझ्या वडिलांना वचन दिले आहे. यावर त्यांनी म्हटले की ज्याच्या जागा जास्त त्याचा मुख्यमंत्री. तेव्हाही मी नाही म्हणालो. कारण मारामाऱ्या होतात, वाद होतात. यानंतर शहा मातोश्रीवर आले, माझ्या काळात हे नाते बिघडले माझ्याच काळात दुरुस्त करायचे आहे असे सांगत त्यांनी मुख्यमंत्री वाटप मान्य केले होते.'' असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.