दहावी-बारावी परीक्षांसाठी प्रश्नसंचाची आवश्यकता!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:17 AM2021-01-08T04:17:07+5:302021-01-08T04:17:07+5:30
परीक्षेचे नियोजन जाहीर करण्याची मागणी लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : शिक्षणमंत्र्यांकडून दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा या १५ एप्रिल व १ ...
परीक्षेचे नियोजन जाहीर करण्याची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : शिक्षणमंत्र्यांकडून दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा या १५ एप्रिल व १ मे नंतर सुरू होतील अशी माहिती दिली आहे, मात्र या परीक्षेला किती व काय अभ्यासक्रम असेल? अभ्यासक्रमात आणखी कपात होणार का? परीक्षा प्रचलित पद्धतीनुसार होणार असली तरी किती गुणांची असेल? या सगळ्याविषयी अद्याप काहीच माहिती दिलेली नाही. जर ३ महिन्यांनंतर दहावी-बारावीच्या परीक्षा होणारच असतील तर अभ्यासक्रमाच्या गोंधळामुळे किमान मंडळाकडून दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रश्नसंच पुरविले जाणे अपेक्षित असल्याची मागणी शिक्षक-विद्यार्थ्यांमधून होत आहे.
राज्यात नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाले असले तरी अद्याप राज्यातील एकूण उपस्थित विद्यार्थ्यांची टक्केवारी केवळ २७ टक्केच आहे. त्यातच आता उपस्थित राहणाऱ्या विद्यार्थ्यांना या आधी झालेला्या ऑनलाइन अभ्यासक्रमाची ही उजळणी करून घ्यावी लागत असल्याने अभ्यासक्रम कसा पूर्ण करणार, असा प्रश्न शिक्षकांना पडला आहे. दरवर्षी दहावीला १७ लाख तर १२वीला १५ लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ठ होतात. हे सर्व विद्यार्थी ९ वीपासून नवीन पॅटर्ननुसार अभ्यास करीत आहेत, त्यामुळे अभ्यासक्रम कमी करावा मात्र पॅटर्न बदलब नये, अशीही मागणी शिक्षकांकडून होत आहे. गेले ८ ते ९ महिने विद्यार्थी ऑनलाइन शिक्षण घेत आहेत, अशा वेळी ऑनलाइन अभ्यासाचे मूल्याकंन केल्यानंतरच दहावी-बारावीच्या लेखी परीक्षांबाबत निर्णय घेतला जावा, अशी मागणी शिक्षक लोकशाही आघाडीचे उपाध्यक्ष राजेश पंड्या यांनी केली आहे.
कोट
शिक्षण विभागाने परीक्षेला अवघे ३ ते ४ महिने राहिलेले असताना विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांवर वाढत असलेला दबाव समजावून घ्यायला हवा. वेळीच प्रश्नपत्रिका परीक्षा पद्धतीचे प्रारूप, वेळापत्रक अन्य विषयांचे श्रेयांकन कसे करावे यासंबंधी मार्गदर्शक सूचना जाहीर कराव्यात.
- राजेश पंड्या, उपाध्यक्ष, शिक्षक लोकशाही आघाडी