पुलांच्या स्ट्रक्चरल आॅडिटचा प्रश्न ऐरणीवर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2018 05:07 AM2018-07-08T05:07:46+5:302018-07-08T05:08:06+5:30
वारंवार होणाऱ्या या दुर्घटनांमुळे महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशभरातीलच पुलांच्या स्ट्रक्चरल आॅडिटचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
- रमेश प्रभू
एल्फिन्स्टन पुलाच्या दुर्घटनेला एक वर्ष होत असतानाच अंधेरी येथील वर्दळीच्या उड्डाणपुलाशेजारील पादचारी पूल कोसळला. पश्चिम रेल्वे बंद झाल्यामुळे बहुतांश मुंबई ठप्प झाली. त्याचवेळी बोरीवली - चर्चगेट लोकल त्या पुलाखालून जाणार होती, परंतु मोटरमनच्या प्रसंगावधानाने वाईट प्रसंग टळला. वारंवार होणाऱ्या या दुर्घटनांमुळे महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशभरातीलच पुलांच्या स्ट्रक्चरल आॅडिटचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
वाढत्या नागरीकरणामुळे नागरी सोई-सुविधा पुरविण्यासाठी शासनाने वेगवेगळी प्राधिकरणे निर्माण केली आहेत. जसे महापालिका, एमएमआरडीए, सिडको, रेल्वे मंडळ, मेट्रो रेल्वे, रस्ते प्राधिकरण, गॅस कंपनी, वीज कंपनी, टेलिफोन कंपनी इत्यादी. या सर्व प्राधिकरणांनी समन्वयाने काम करणे अपेक्षित आहे. परंतु जेव्हा विशेषत: पावसाळ्यात मोठी दुर्घटना घडते तेव्हा ही सर्व प्राधिकरणे आपापली जबाबदारी झटकून एकमेकांना दूषणे देण्याचे काम करतात, हे दुर्दैवी आहे. यामध्ये भरडला जातो तो सामान्य माणूस. त्याचा रोजगार बुडतो, त्याला आर्थिक नुकसानीबरोबर मानसिक तापही सहन करावा लागतो.
परवा अंधेरी पूल कोसळल्यानंतर या पुलाची देखभाल कोणी करायची याबाबत चाललेल्या वादावादीवर उद्विग्न होऊन मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई महापालिका, रेल्वे आणि राज्य शासनाला खडसावले आणि सर्व पुलांचे सुरक्षा आॅडिट करण्याचे आदेश दिले. न्यायाधीश म्हणाले, आम्ही लोकांना असेच मरू किंवा जखमी होताना बघू शकत नाही. पूल सुरक्षित आहेत या खात्रीने पादचारी त्यांचा वापर करतात. जर कोणालाच जबाबदार धरण्यात येऊ शकत नसेल तर कोणाला दोषी धरावे? दोषींवर कडक कारवाईची व्यवस्था असली पाहिजे. सर्वप्रथम शहरातील सर्व पुलांचे आॅडिट व्हायला हवे. सर्व धोकादायक पूल शोधून काढण्यासाठी एक तज्ज्ञ मंडळ स्थापन करणे आवश्यक आहे.
महाराष्ट्रातील फक्त रेल्वे पादचारी आणि उड्डाणपूलच नाहीत तर सर्व नदी-नाल्यांवरील पूल, बोगदे जेथून प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणात होते त्यांच्या कायमस्वरूपी तपासणीसाठी गस्ती पथक, वारंवार दुरुस्ती व देखभाल, किमान वर्षातून एकदा आॅडिट यासाठी एक कायम स्वतंत्र यंत्रणा उभारणे आवश्यक आहे. तसेच सर्व यंत्रणांमध्येही समन्वय असणे आवश्यक आहे. नैसर्गिक आपत्ती या येतच राहणार. परंतु त्याच्यापासून सुरक्षित राहण्यासाठी आपल्याकडे योग्य व्यवस्थापनाची आवश्यकता असेल तर आपल्याला मनुष्यहानी आणि वित्तहानी टाळता येईल.
(लेखक वास्तुविशारद आहेत.)