उसाच्या प्रश्नावरून सरकारवर हल्लाबोल
By admin | Published: March 28, 2015 01:47 AM2015-03-28T01:47:12+5:302015-03-28T01:47:12+5:30
ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सर्वपक्षीय सदस्यांनी एकजुटीने विधानसभेत आवाज उठवला. उसाला प्रतिटन किमान ५०० रुपयांची मदत आणि कारखान्यांना आयकरात सूट द्यावी,
मुंबई : ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सर्वपक्षीय सदस्यांनी एकजुटीने विधानसभेत आवाज उठवला. उसाला प्रतिटन किमान ५०० रुपयांची मदत आणि कारखान्यांना आयकरात सूट द्यावी, अशी मागणी करतानाच ऊस उत्पादकांचा रोष पत्कराला तर तुमचा मुंबई-कोल्हापूर प्रवास सुखाचा होणार नाही, असा इशारा माजी मंत्री जयंत पाटील यांनी सहकार मंत्र्यांना दिला.
ऊसदरप्रश्नी नियम २९३ अन्वये उपस्थित केलेल्या चर्चेला जयंत पाटील यांनी सुरुवात केली. ऊस उत्पादक आज एकाकी पडला आहे. त्याला भविष्यात दिलासा द्यायचा असेल तर ऊसाचा एफआरपी ठरवताना साखरेचा हमीभाव देखील ठरवा. म्हणजे सध्याचे संकट पुन्हा उद्भवणार नाही, अशी सूचना त्यांनी केली. स्वत:ला शेतकऱ्यांचे नेते म्हणवणारे मंत्रिपदासाठी सरकारवर आंदोलनाच्या माध्यमातून दबाव आणत आहेत, अशी टिकाही त्यांनी खा. राजू शेट्टी यांचा नामोल्लेख न करता केली. केंद्र सरकारने तिजोरीवर भार पडू नये म्हणून साखरेच्या निर्यातीला उशिरा परवानगी दिली. आज साखरेचे भाव कमी आणि कच्चा माल म्हणजे उसाचे दर जास्त असे पहिल्यांदाच घडले आहे. शेतकऱ्यांना प्रतिटन अनुदान त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्याची मागणी त्यांनी केली.
अजित पवार म्हणाले की, सुमारे अडीच कोटी लोक साखर उद्योगांवर अवलंबून आहेत. परदेशी व्होडाफोन कंपनीला ३ हजार कोटी रुपयांचा कर केंद्र सरकारने माफ केला; मग ऊस उत्पादकांना मदत देण्यात खळखळ कशासाठी, असा प्रश्नही त्यांनी केला.