Join us  

आदिवासी आश्रमशाळांचे प्रश्न मार्गी लावणार

By admin | Published: March 31, 2017 4:09 AM

राज्यातील शासकीय आणि अनुदानित आदिवासी आश्रमशाळांमधील सर्व प्रश्न तातडीने निकाली काढण्याची ग्वाही

मुंबई : राज्यातील शासकीय आणि अनुदानित आदिवासी आश्रमशाळांमधील सर्व प्रश्न तातडीने निकाली काढण्याची ग्वाही आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांनी दिली आहे. आश्रमशाळांच्या प्रश्नांबाबत शिक्षक परिषदेच्या शिष्टमंडळाने आदिवासी विकासमंत्र्यांसोबत गुरुवारी मंत्रालयात सहविचार सभा आयोजित केली होती. त्यात सवरा यांनी विविध प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.शिक्षक परिषदेचे अध्यक्ष वेणुनाथ कडू आणि आमदार नागो गाणार यांच्यासह बैठकीत आदिवासी विकास खात्यातील सर्व अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत ‘काम नाही, वेतन नाही’ हा शासन निर्णय पूर्वलक्षी प्रभावाने रद्द करण्याची प्रमुख मागणी करण्यात आली. सोबतच अनुदानित आदिवासी आश्रमशाळेतील अतिरिक्त कर्मचाऱ्यांना शासकीय आश्रमशाळेत किंवा अन्य विभागात समायोजित करण्याचे आवाहन शिष्टमंडळाने केले. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची वैयक्तिक प्रलंबित प्रकरणे तातडीने सोडविण्यासंदर्भात तसेच अन्य महत्त्वाच्या विषयांवर या सहविचार सभेत चर्चा करण्यात आली. अधिकाऱ्यांना तातडीने सर्व प्रश्न मार्गी लावावेत, अशा सूचना सवरा यांनी दिल्या. त्यामुळे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न तातडीने सुटतील, असा विश्वास शिक्षक परिषदेचे राज्याध्यक्ष वेणूनाथ कडू यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)