मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना वृत्तपत्राला दिलेल्या प्रदीर्घ मुलाखतीच्या माध्यमातून मराठवाडाच्यापाणी प्रश्नावर भाष्य केलं आहे. मराठवाड्यात पाण्याचे दुर्भिक्ष्य प्रचंड आहे. मध्यंतरी तर लातूरला ट्रेननं पाणी द्यावं लागलं होतं. त्यामुळे पाण्याचे जे काही प्रकल्प आहेत ते मार्गी लावण्यासाठी मी सुद्धा सूचना दिलेल्या आहेत, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे.
सामनाचे कार्यकारी संपादक, खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग प्रकाशित करण्यात आला. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी अनेक विषयांवर चर्चा केली. यावेळी मराठवाड्या पाणीप्रश्न महत्त्वाचा आहे. काय करणार त्याचं? असा सवाल संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांनी विचारला. त्यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, "मराठवाड्याच्या बैठकांमध्ये हा पाण्याचा प्रश्न नक्कीच समोर आला आहे. खूपच मोठा प्रश्न आहे. मराठवाडा हा गेली काही वर्षे सतत दुष्काळात आहे. पाण्याचं दुर्भिक्ष्य प्रचंड आहे. मध्ये तर लातूरला ट्रेनने पाणी द्यावं लागलं होतं. तर त्यासाठी पाण्याचे जे काही प्रकल्प आहेत ते मार्गी लावण्यासाठी सुद्धा मी सूचना दिलेल्या आहेत. म्हणून मी पंकजाला एक पत्र लिहिलं आहे की, तू हा जो मुद्दा काढला आहेस, ऐरणीवर आणला आहेस…धन्यवाद! पण त्याबद्दल सरकार संवेदनशील तर आहेच; पण हा प्रश्न पंकजाने मांडण्याच्या आधीच मी मार्गी लावण्याच्या सूचना दिलेल्या आहेत."
दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी मराठवाड्यातील पाणी प्रश्नावर भाजपाच्या नेत्या आणि माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी औरंगाबाद येथील विभागीय कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केलं होतं. या उपोषणाला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही उपस्थिती लावली होती. त्यावेळी जलयुक्त शिवार योजना बंद करण्याच्या आणि मराठवाड्याचं पाणी थांबवण्याच्या तयारीत राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार करत असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला होता.
देवेंद्र फडणवीस म्हणाले होते, "उलट आमच्या सरकारने कृष्णा मराठवाडा योजनेसाठी ४००० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला. त्यामुळे हे पाणी बीड, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात येणार आहे. मात्र, ते या सरकारमुळं बंद होणार असल्याची शंका आम्हाला आहे. त्यामुळेच पंकजा मुंडेंच्या नेतृत्वाखाली उपोषणाचा निर्णय घेण्यात आला. मराठवाड्याचं हे पाणी थांबवण्याचा प्रयत्न केल्यास मराठवाडा रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला या योजनेचं श्रेय घ्यायचं असेल तर घ्या, त्याचं नाव बदलायचं असेल तर बदला पण जनतेच्या मनातली 'जलयुक्त शिवार योजना' बंद करु नका. ५ वर्षात जलयुक्तच्या माध्यमातून मराठवाड्यात आम्ही पाणीक्रांती आणली. त्यामुळे ही योजना बंद केलीत तर मोठी लढाई लढू," असा इशाराही यावेळी फडणवीस यांनी सरकारला दिला होता.
याशिवाय, पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या की, "मराठवाड्यातील प्रश्न गंभीर असून यावर तोडगा काढणे गरजेचे आहे. येथील शेतकऱ्याला पाणी उपलब्ध करून द्या, त्यांना कर्जमाफीचीही गरज पडणार नाही. ही लढाई हक्काच्या १७ टीएमसी पाण्यासाठी आहे. भाजपा-सेना युतीच्या काळात मराठवाड्यासाठी अनेक जलसिंचन प्रकल्पांची आखणी करण्यात आली आहे. त्यासाठी आर्थिक तरतूदही केली आहे. आता ते प्रकल्प लवकर कसे पूर्ण होतील याची काळजी या सरकारला घ्यायची आहे. मराठवाड्यातील कोणतेही सिंचन प्रकल्प बंद करू नका, असे आवाहनही त्यांनी यावेळी केलं होतं.
महत्त्वाच्या बातम्या
जवानांना आवश्यकतेनुसार जेवण, कपडे मिळत नाहीत; कॅगचा ठपका!
प्राध्यापिकेला भररस्त्यात पेट्रोल टाकून पेटविले; महाराष्ट्र हळहळला, सर्वत्र संतापाची भावना
China Coronavirus : चीनमधील मृतांची संख्या ३६१; आतापर्यंत १७,२०५ लोकांना संसर्ग