Join us

महापौरांचा मुख्यमंत्र्यांना सवाल, नागपूरच्या पाणीबाणीवरुन महाडेश्वर कडाडले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2018 6:33 PM

शहरात पावसामुळे पाणीबाणी सदृश्य परिस्थिती उद्भवली आहे. यावरुन मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी नागपूर महापालिकेच्या कारभारावर टीका केली.

नागपूर - शहरात पावसामुळे पाणीबाणी सदृश्य परिस्थिती उद्भवली आहे. यावरुन मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी नागपूर महापालिकेच्या कारभारावर टीका केली. नागपूर महापालिकेने नालेसफाई केली होती का नाही, असा सवाल महाडेश्वर यांनी विचारला आहे. नागपुरात आज सहा तासांमध्ये २६३.५ मिमी पावसाची नोंद झाली. सकाळी साडेआठ ते दुपारी अडीच या कालावधीतील हा पाऊस आहे. या पावसामुळे महाराष्ट्राची उपराजधानी असलेले हे शहर पूर्णपणे तुंबले आहे. यापूर्वी २१ जुलै १९९४ रोजी २४ तासांत ३०४.६ मिमी पावसाची नोंद झाली होती.

मुंबई ही सात बेटांची बनली असून थोडा पाऊस पडला तरी मुंबई तुंबली म्हणून सत्तेत असून शिवसेनेवर उठसूठ टीका करणारे मुंबई भाजप अध्यक्ष व आमदार अँड.आशिष शेलार यांनी आज नागपूर का तुंबले याचा शोध घ्यावा असा टोला मुंबईचे महापौर प्रा.विश्वनाथ महाडेश्वर यांनी लोकमतशी बोलतांना लगावला. याउलट पावसाळ्यात मुंबई तुंबून मुंबईकरांना नाहक त्रास होऊ नये आणि पावसाळ्यापूर्वी मुंबईतील नाल्यातील गाळ 100 टक्के काढला आहे का नाही याची आपण स्वतः आणि युवासेनाप्रमुख व शिवसेना नेते आदित्य ठाकरे व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जातीने पाहणी केली होती. तशी नागपूर येथे नालेसफाई झाली की नाही, त्याची पाहणी जर पावसाळ्यापूर्वी केली असती तर नागपूरमध्ये नाले व गटारे तुंबली नसती आणि विधानसभेचे काम आज सुरळीत झाले असते, असा टोला महापौरांनी मुख्यमंत्र्यांना लगावला. पावसाळी अधिवेशनाच्या आजच्या तिसऱ्या दिवशी पावसामुळे सभागृहातील वीजपुरवठा खंडीत झाल्याने कामकाज दिवसभरासाठी बंद करण्यात आले. विधीमंडळाच्या परिसरात, आवारामध्ये जो काही पाऊस पडला त्याचे पाणी ड्रेनेजच्या माध्यमातून, गटाराच्या माध्यमातून नीटपणे जायला हवं होतं. मात्र, गटारे तुंबल्याने विधानभवन परिसरामध्ये पाणी तुंबलं आणि त्या पाण्यातच वीजेचं सबस्टेशन गेल्याने सभागृहाची लाईट गेली. या सर्वांचा परिणाम म्हणून आजचं कामकाज बंद करण्यात आलं. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूरचे आणि विशेष म्हणजे ते नागपूर शहराचे महापौर होते. आज नागपूर महापालिकेत भाजपची सत्ता असून महापौरही त्यांच्याच पक्षाचा आहे. त्यामुळे आज नागपूरात नाले तुंबल्यामुळे विधानसभेचे कामकाज बंद पडायला जबाबदारही येथील महापालिका नाही का, असा सवाल महापौरांनी केला. तसेच याप्रकरणी चौकशी व्हावी असी मागणी महाडेश्वर यांनी केली आहे.

टॅग्स :नागपूरदेवेंद्र फडणवीसपाऊस