रिपोर्टर : जयेश शिरसाट, अमर मोहिते, सचिन लुंगसे, सुशांत मोरे, तेजस वाघमारे, चेतन ननावरे, स्नेहा मोरे, मनीषा म्हात्रे
गेल्या काही वर्षांत दहशतवादी संघटनांनी मुंबईला टार्गेट करीत अनेक बॉम्बस्फोट घडवले. त्यात आजवर शेकडो नागरिकांचे बळी गेले तर अनेक जण कायमचे जायबंदी झाले. दहशतवादी कारवायांपासून बचाव करण्यासाठी सावधगिरी बाळगणे नागरिकांच्या हाती आहे. तशी अपेक्षा पोलीस यंत्रणेकडून व्यक्त केली जात असली तरी मुंबईकरांना अशा घटनांकडे लक्ष देण्यास वेळ नाही. ११ जुलैला लोकलमध्ये झालेल्या बॉम्बस्फोट मालिकेला नऊ वर्षे पूर्ण होत असताना लोकमत रिअॅलिटी चेकमध्ये हेच प्रकर्षाने जाणवले.> सीएसटी ते वाशी
क्लास - फर्स्ट क्लास , वेळ : संध्या. 06:33 काय घडले ? छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर ६ वाजून ३३ मिनिटांची वाशीला जाणारी ट्रेन दोन मिनिटे आधी लागली. एका प्रतिनिधीने फर्स्ट क्लास डब्यात चढत डोअरचा ताबा घेतला. काही वेळाने हातातील बॉक्स घेतलेला दुसरा प्रतिनिधी डब्यात शिरला. हातातील बॉक्स मधल्या पॅसेजमध्ये ठेवत दुसरा प्रतिनिधी विरुद्ध बाजूस उभा राहिला तेव्हा ंहा बेवारस बॉक्स कोणाचा?’ हे विचारण्याचे कष्ट कोणीही घेतले नाहीत. तितक्यात प्लॅटफॉर्म क्रमांक १ वरून दोन महिला रेल्वे पोलीस आत शिरल्या. बॉक्सच्या बाजूला कोणीही उभे नव्हते, तरीदेखील त्यांना त्यात काहीही संशयास्पद वाटले नाही. दुसऱ्या दरवाजाने त्या लगेचच बाहेर पडल्या. तरीही पॅसेजमध्ये ठेवलेल्या बॉक्सवर त्यांची नजर गेली नाही. ट्रेन मस्जिद बंदरला पोहोचल्यावर काही प्रवासी डब्यात शिरले. त्यातील चार प्रवाशांच्या घोळक्याने संबंधित प्रतिनिधीस बॉक्स उचलण्याची विनंती केली. तसे प्रतिनिधीने बॉक्स उचलून डोअरशेजारी ठेवला. सँडहर्स्ट रोड स्थानकानंतर आलेल्या डॉकयार्ड रोड स्थानकावर बॉक्सकडे न पाहताच प्रतिनिधी उतरला. मात्र चार प्रवाशांच्या घोळक्याने त्याकडे लक्ष दिले नाही. त्या व्यक्तीने ठेवलेला बॉक्स तसाच आहे, याकडे गप्पा मारणाऱ्या घोळक्याचे लक्षच नव्हते. मात्र डोअरशेजारी उभ्या असलेल्या एका व्यक्तीने ते हटकले. ट्रेन सुरू झाल्यावर त्या प्रवाशाने ‘हा बॉक्स कोणाचा’ म्हणून विचारणा केली. त्यावर सर्व प्रवासी दचकून बॉक्सकडे पाहू लागले. मात्र दुसऱ्या प्रतिनिधीने आपण त्या व्यक्तीसोबत होतो, असे सांगताच सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास टाकला. संबंधित व्यक्तीने दाखवलेल्या प्रसंगावधानाचे इतर प्रवाशांनी ‘अॅलर्ट सिटीजन’ म्हणत कौतुकही केले.> मुंबई सेंट्रल टर्मिनसक्लास - फर्स्ट क्लास, वेळ : संध्या.06:48 काय घडले? मुंबई सेंट्रल टर्मिनसवरून सुटणाऱ्या गाड्यांची वाट शेकडो लोक पाहत होते. ‘लोकमत’ प्रतिनिधीने येथील एका खुर्चीखाली कुकर असलेली बॅग ठेवली. तेथे पाच मिनिटे बसल्यानंतर प्रतिनिधी बॅग तशीच ठेवून गेला. सुमारे पंधरा मिनिटे येथे तैनात असलेल्या पोलीस, होमगार्ड आणि नागरिकांच्या हा प्रकार अजिबात लक्षात आला नाही. अखेर दुसऱ्या प्रतिनिधीने ती बॅग उचलून आणली. तरी आजूबाजूला बसलेल्या कोणत्याही व्यक्तीने याबाबत विचारणा केली नाही. याच टर्मिनसवर असंख्य पोलीस होते, पण कोणीही या प्रकाराला हटकले नाही. > चर्चगेट ते अंधेरीकाय घडले? : चर्चगेटच्या दिशेने येणाऱ्या लोकलच्या फर्स्ट क्लास डब्यातून प्रवास करताना आलेला अनुभव पाहिल्यानंतर पुन्हा चर्चगेटहून सुटलेल्या अंधेरी लोकलमधून ‘लोकमत’ प्रतिनिधींनी प्रवास सुरू केला. पुन्हा तोच अनुभव आला. फर्स्ट क्लास डब्यातून प्रवास करताना कुकर असलेली पिशवी रॅकवर ‘लोकमत’ प्रतिनिधीने ठेवली. पुढे हा प्रतिनिधी मुंबई सेंट्रल स्थानकात उतरून गेला. मात्र महालक्ष्मी स्थानक येईपर्यंत या बेवारस पिशवीकडे कोणाही प्रवाशाचे साधे लक्षदेखील गेले नाही. सर्व प्रवासी ढिम्म असल्याचे दिसून आले. महालक्ष्मीला उतरताना ‘लोकमत’च्या अन्य एका प्रतिनिधीने ही पिशवी ताब्यात घेतली. मात्र त्यानंतरही कोणाही प्रवाशाच्या ही बाब लक्षात आली नाही. > महालक्ष्मी ते चर्चगेटकाय घडले ? दादर दिशेने असलेल्या फर्स्ट क्लास पुरुषांच्या डब्यातून ‘लोकमत’च्या एका प्रतिनिधीने प्रवास सुरू केला. प्रतिनिधी त्याच्या जवळ असलेल्या पिशवीत कुकर घेऊन लोकलमध्ये चढला. ही पिशवी रॅकवर ठेवली. दहा मिनिटांच्या प्रवासानंतर बॅग ठेवलेला प्रतिनिधी मरिन लाइन्स स्थानकात उतरून गेला. मात्र ही बॅग त्याची असून तो विसरून जात असल्याने कोणीही त्याला हटकले नाही. पाच मिनिटांनंतर लोकल चर्चगेट स्थानकात आली. मात्र पिशवी त्याच जागेवर होती. या प्रवासात प्रवाशांचा जागरूकपणा दिसून आला नाही.