सोमय्यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह; मनसे उमेदवार देणार का, हीच उत्सुकता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2019 05:27 AM2019-02-13T05:27:16+5:302019-02-13T05:27:40+5:30
ईशान्य मुंबई किंवा उत्तर पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघ हा आघाडीच्या जागावाटपात राष्ट्रवादीकडे येणारा मुंबईतील एकमेव मतदारसंघ. राष्ट्रवादीच्या संजय दिना पाटील यांचा तब्बल तीन लाखांच्या फरकाने भाजपाच्या किरीट सोमय्या यांनी पराभव केला होता.
- गौरीशंकर घाळे
(मतदारसंघ । उत्तर पूर्व मुंबई)
ईशान्य मुंबई किंवा उत्तर पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघ हा आघाडीच्या जागावाटपात राष्ट्रवादीकडे येणारा मुंबईतील एकमेव मतदारसंघ. राष्ट्रवादीच्या संजय दिना पाटील यांचा तब्बल तीन लाखांच्या फरकाने भाजपाच्या किरीट सोमय्या यांनी पराभव केला होता. २०१४च्या या निकालानंतर थेट १ जानेवारी, २०१९ लाच दिना पाटील यांचे बॅनर झळकले. ‘मी येतोय’ या मथळ्याची तेव्हा चर्चाही झाली. मधल्या काळात ते भाजपात वगैरे जाणार असल्याच्या चर्चा होत्या. शिवाय, राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्या कार्यक्रमात घुसून घातलेल्या गोंधळ आणि त्यानंतरचा वाद, यामुळे ‘मी येतोय’ म्हणजे नक्की कुठे, असाही प्रश्न विचारला गेला.
मनसेचे इंजिन आघाडीला जोडले जावे, यासाठी घड्याळवाले प्रयत्नशील असल्याची चर्चा काही काळ राजकीय वर्तुळात होती. मनसेसाठी ईशान्य मुंबईची जागा सोडावी, या प्रस्तावाचीही चर्चा झाली. मात्र, शिशिर शिंदे या शिलेदाराने अलीकडेच शिवसेनेचा भगवा हाती घेतल्याने मनसेकडे सक्षम उमेदवारही नाही. शिवाय, काँग्रेसने सुरुवातीपासूनच मनसेला विरोध दर्शविला. आता तर खुद्द शरद पवार यांनीच मनसे आघाडीत येण्याची शक्यता फेटाळून लावली. त्यानंतर, मनसेच काय तर काँग्रेससाठीसुद्धा ही जागा सोडणार नाही, अशी गर्जना राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी केली. सध्या तरी संजय दिना पाटील हेच नाव राष्ट्रवादीकडून चर्चेत आहे, परंतु कमकुवत पक्षसंघटना, अंतर्गत संघर्ष आणि मधल्या काळात गायब असलेले दिना पाटील, यामुळे राष्ट्रवादीचा प्रवास आव्हानात्मकच असणार आहे.
७६,४२७ मतांसह आप तिसऱ्या क्रमांकावर होती. ज्येष्ठ समाजसेविका मेधा पाटकर यांच्या उमेदवारीमुळे आपला इतकी मजल मारता आली. यंदा तशी परिस्थिती नाही. निवडणूक लढविण्यासाठी पैसे लागतात आणि ते माझ्याकडे नाहीत, अशा स्वच्छ शब्दात स्वत: मेधा पाटकर यांनी निवडणूक लढविणार नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यांच्या अनुपस्थितीत पाऊण लाखांपर्यंतची मते खेचू शकणारा उमेदवार आपकडे नाही. शिवाय, पाच वर्षांपूर्वीचे आपबाबतचे कुतूहलही आता राहिलेले नाही.
शिवाजीनगर, गोवंडी-मानखुर्द हा परिसर मुस्लीम बहुल आहे. समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आझमी यांचा हा मतदारसंघ. याशिवाय, मतदारसंघात दलित मतदारांची संख्याही लक्षणीय आहे. त्यामुळे बसपा, भारिप बहुजन महासंघ आदी पक्षांचे उमेदवारांना इथे कायमच चौथ्या, पाचव्या क्रमांकाची मते मिळत आली आहेत. आगामी निवडणुकांसाठी सपा आणि बसपाने काँग्रेसला वगळून आघाडीची घोषणाही करून टाकली आहे. महाराष्ट्रात सपाला काँग्रेस आघाडीत सामील करून घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्या दृष्टीने बैठकाही झाल्या. तसे झाल्यास राष्ट्रवादीच्या उमेदवाराला फायदा होऊ शकतो. तिकडे, एमआयएम आणि भारिपच्या वंचित बहुजन आघाडीसोबतही महाआघाडीचे गणित जुळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. एमआयएम आणि सपाची परस्परविरोधी भूमिका पाहता, आघाडीच्या स्थानिक उमेदवारालाच इथल्या जर-तरचे प्रश्न सोडवावे लागणार आहेत.
भाजपाचे विद्यमान खासदार किरीट सोमय्या उमेदवारीसाठी उत्सुक आहेत. स्वत:च्या संस्था, संघटनांच्या माध्यमातून मतदारसंघात त्यांनी कामाचे जाळेही उभारले आहे. खासदार फंडातूनही मोठ्या प्रमाणावर कामे झाली. महापालिका निवडणुकीपूर्वी त्यांनी शिवसेनेला अंगावर घेताना थेट ‘मातोश्री’वर आरोपांची राळ उडवून दिली. त्यामुळे शिवसेना सोमय्यांना मनापासून साथ देईलच, असे नाही. गुजराती, मराठी भाषिक वादही सोमय्यांच्या विरोधात गेला. प्रचाराने भाषिक, जातीय वळण घेतल्यास भाजपाच्या अडचणी वाढतील, शिवाय, आघाडीच्या काळात फूटपट्टीने रेल्वे व फलाटातील अंतर मोजणारे सोमय्या खासदारकीच्या पाच वर्षांत कुठे हरविले होते, असा सवालही विरोधक करतात. त्यातच भाजपाच्या अंतर्गत सर्वेक्षणात सोमय्या डेंजर झोनमध्ये असल्याचे वृत्त आहे.
सोमय्यांचे तिकीट कापून नवीन चेहºयाला संधी दिली जाणार असल्याची चर्चा भाजपाच्या वर्तुळात आहे. १९९५ साली भाजपाचे विद्यमान आमदार वामनराव परब या निष्ठावंत कार्यकर्ता-नेत्याला डावलून सोमय्यांना उमेदवारी दिली गेली. आता सोमय्यांचे तिकीट कापले गेले, तर त्यांच्या बाबतीत राजकारणातील एक वर्तुळ पूर्ण झाले, असे म्हणता येईल.
सध्याची परिस्थिती
मुलुंड डम्पिंग ग्राऊंडच्या प्रश्नावर कोणताच तोडगा निघाला नाही. आजही मुलुंडकरांसाठी हा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे.
विरोधकांवर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात सोमय्या आघाडीवर राहिले. मात्र, पाच वर्षांत त्यांनी त्याचे काय केले, असा सवाल विरोधक करीत आहेत.
मुस्लिमबहुल वस्त्यांमधून कधीच भाजपाला मतदान झाले नाही. तिहेरी तलाकमुळे महिलांकडून भाजपाला अंधुक आशा.
भाजपा सरकारने दलित हिताचे अनेक निर्णय घेतले, तरीही समाज जोडला गेला नाही. त्यातच भीमा-कोरेगावने आगीत तेल ओतल्याची भाजपा कार्यकर्त्यांची भावना.
२०१४ मध्ये मिळालेली मते
5,25,285
किरीट सोमय्या
(भाजपा)
2,08,163
संजय दिना पाटील
(राष्ट्रवादी काँग्रेस)
76,451
मेधा पाटकर
(आप)
17,427
मच्छिंद्र चाटे
(बसपा)
8,833
अविनाश डोळस
(भारिप-बहुजन महासंघ)