Join us

संजय राऊतांच्या कृतीबद्दल प्रश्न; खासदार श्रीकांत शिंदेचं असंय प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2023 12:39 PM

संजय राऊत यांना आमदार संजय शिरसाट यांच्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, उत्तर देण्याऐवजी राऊत यांनी थुंकून आपला रोष व्यक्त केला.

मुंबई - शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत हे वादग्रस्त विधानांमुळे कायम चर्चेत असतात. त्यातच, ४ दिवसांपूर्वी त्यांनी शिंदे गटातील काही नेत्यांसदर्भात पत्रकारांनी प्रश्न विचारला असता थुंकून आपला राग व्यक्त केला. त्यावरुन, त्यांना अनेकांनी टार्गेट केलं. तर, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही महाराष्ट्राचे संस्कार आणि राजकीय संस्कृती सांगत भाष्य केलं. त्यावर, पुन्हा संजय राऊत यांनी अजित पवारांच्या धरणातील पाण्यासंदर्भातील विधानाची आठवण करुन देत पलटवार केला. त्यामुळे, संजय राऊत आणि वादग्रस्त कृती याची चर्चा जोमाने होत आहे. आता, स्वत: खासदार श्रीकांत शिंदे यांनी संजय राऊतांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय.

संजय राऊत यांना आमदार संजय शिरसाट यांच्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, उत्तर देण्याऐवजी राऊत यांनी थुंकून आपला रोष व्यक्त केला. त्याचप्रमाणे मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावरील प्रश्नावरही सेम रिएक्शन दिली. त्यावरुन, चांगलाच वाद रंगला. शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी संजय राऊत यांच्याविरुद्ध आंदोलनेही केली. आता, स्वत: श्रीकांत शिंदे यांनी पहिल्यांदाच संजय राऊतांच्या थुंकण्याच्या कृतीवरुन भाष्य करत पलटवार केला. 

माझ्यावर टीका करा, पण माझे उत्तर कामातून असेल. आम्ही पातळी कधी सोडलेली नाही आणि सोडणार देखील नाही. महाराष्ट्राची संस्कृती बिघडवण्याचे काम ते करतात अशी टीका श्रीकांत शिंदे यांनी केली. पुढे बोलताना श्रीकांत शिंदे म्हणाले की, महाराष्ट्राला वेगळा इतिहास आहे. वेगळी संस्कृती आहे, जिथे विरोधक देखील एकमेकांचे नाव आदराने घेतात. आज सगळ्या पातळ्या सोडून सकाळपासून रात्री झोपेपर्यंत शिव्या देण्याचा काम सुरू आहे. महाराष्ट्राचे सांस्कृतिक दूषित करण्याचं काम सुरू आहे. बाकीचे राज्य, युवक आपल्याकडे कशाप्रकारे बघत आहेत. राजकारणाकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा कसा होत आहे. हा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. इथून मागे देखील सत्तांतरे झाली. मात्र, गेल्या दहा महिन्यापासून शिवसेना भाजपची सत्ता आल्यापासून पातळी सोडून हीन दर्जाचे राजकारण या ठिकाणी केले जात आहे. महाराष्ट्राची संस्कृती बिघडवण्याचे  काम सध्या सुरू आहे, अशा शब्दात खासदार शिंदे यांनी संजय राऊतांच्या कृतीवर पलटवार केला.  दरम्यान, यासंदर्भात स्पष्टीकरण देताना राऊत यांनी, माझी जीभ दाताखाली आली म्हणून मी थुंकलो असे सांगितले. 

अजित पवारांची दिलगिरी

अजित पवारांबाबत मला अर्धवट आणि वेगळा प्रश्न पत्रकारांनी विचारला होता. त्यावर मी कडक शब्दात उत्तर दिले, त्याचा मला खेद वाटतो, मी असे बोलायला नको होते असं सांगत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी खुलासा केला आहे. धरणात मुंतण्यापेक्षा थुंकलेले बरे असं सांगत राऊतांनी अजित पवारांवर शनिवारी प्रहार केला होता. त्यावरून आज राऊतांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.

टॅग्स :संजय राऊतशिवसेनाश्रीकांत शिंदे