मुंबई - राज्य सरकारमध्ये झालेल्या काही बदलांमुळे मंत्रिमंडळात बदल होणार असल्याची चर्चा आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी माजी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांची निवड झाली आहे. तर, उपमुख्यमंत्रीपदासाठीही काँग्रेस नेत्याची वर्णी लागणार आहे . त्यामुळे, सरकारमध्ये नवीन खातेबदल व खातेवाटपाची तयारी सुरू असल्याचा प्रश्न उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारण्यात आला होता. त्यावर, त्यांनी मजेशीर उत्तर दिलंय.
आमच्यामध्ये थोडीशी नव्हे... तसूभरही चर्चा नाही. त्यामुळे तुमचे सोर्सेस काय आहेत ते मला कळू शकणार नाही, असा मिश्किल टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लगावला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा जनता दरबार आज होता. त्यावेळी माध्यम प्रतिनिधींनी सरकारमधील खातेवाटपाचा प्रश्न विचारला असता या बातम्या मीडियातीलच आहेत असेही त्यांनी स्पष्ट केले. खातेवाटप हा अधिकार तिन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांचा आहे. तिन्ही नेते यासंदर्भाचा निर्णय घेतील आणि हा निर्णय तिन्ही पक्षाला मान्य असेल असेही पवार म्हणाले.
राज्यस्तरावर काम करणारे माझे सहकारी बाळासाहेब थोरात, अशोकराव चव्हाण, जयंत पाटील, भुजबळसाहेब, एकनाथ शिंदे, सुभाष देसाई यापैकी आमच्या कुणाच्या कानावर खातेवाटपाबाबत अशी बातमी नाही, त्यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.
नाना पटोलेंकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी
काँग्रेसमध्ये गेल्या काही दिवसांपासून पक्ष संघटनेत मोठे फेरबदल करण्यात येत आहे, यात विधानसभा अध्यक्षपदी असलेले नाना पटोले यांना राजीनामा द्यायला सांगून त्यांना प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली. बाळासाहेब थोरात यांनी प्रदेशाध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त करावे अशी विनंती पक्षाच्या हायकमांड सोनिया गांधी यांच्याकडे व्यक्त केली होती, त्यानंतर प्रदेशाध्यक्षपदासाठी अनेक नावं चर्चेत होती.
नितीन राऊत यांच्या नावाची चर्चा
नाना पटोले यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड केल्यानंतर आता विधानसभा अध्यक्षपदी कोण विराजमान होणार याची चर्चा सुरू आहे, तत्पूर्वी नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी सोनिया गांधी यांची भेट घेतली आहे. त्यामुळे पटोले आणि राऊत यांच्या खांदेपालट होणार का? अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. विधानसभा अध्यक्षपदासाठी पृथ्वीराज चव्हाणांपासून के. सी पाडवी यांच्या नावाची चर्चा सुरु होती, यातच आता संग्राम थोपटे हे नवीन नाव पुढे आलं आहे.