जयंत होवाळ
मुंबई : ‘भाजपला बिनशर्त पाठिंबा’ म्हणजे रस्त्यावर उतरून भाजपच्या उमेदवाराचा प्रचार करायचा का? ज्या मतदारसंघात भाजपचा उमेदवार नसल्यास तिथे कोणती भूमिका घ्यायची? तेथे शिंदे की अजित पवार कोणत्या उमेदवाराचा प्रचार करायचा, असे प्रश्न सामान्य मनसैनिकाला पडले आहेत. मोदी यांच्या मुंबईतील प्रचारसभेत राज ठाकरे यांना आमंत्रण आले तर ते सभेला जातील का? असाही प्रश्न मनसैनिकांना आहे.
भाजपला बिनशर्त पाठिंबा देण्याचा संदेश पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचला आहे. पण स्थानिक पातळीवर अंमलबजावणीत अजून स्पष्टता नाही. राज यांचा आदेश कार्यकर्ते १०० टक्के पाळणार, असे वरिष्ठ पदाधिकारी सांगतात. मात्र स्थनिक पातळीवर कस लागेल. ज्या मतदारसंघात मनसे आणि भाजप यांच्यात वितुष्ट असेल तिथे काय भूमिका घ्यावी, असा पेच निर्माण होऊ शकतो. भाजपला पाठिंबा देण्याबाबत ठाकरे यांच्या भूमिकेविषयी सामान्य शिवसैनिकांशी संवाद साधला असता ‘शतप्रतिशत भाजप’ वर शिक्का मारण्याचा निर्धार झाल्याचे अजून तरी जाणवले नाही.
राज आणि उद्धव यांच्यात जसे वितुष्ट आहे तसे स्थानिक पातळीवर दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांमध्ये नाही. त्यामुळे एखाद्या मतदारसंघात भाजपला मदत करायची इच्छा नसेल तर मनसेच्या कार्यकर्त्यांकडे ठाकरे गटाचा किंवा स्थनिक पातळीवर काँग्रेस किंवा शरद पवार गटाच्या ज्या उमेदवारासोबत त्यांचा दोस्ताना असू शकतो, त्या बाजूनेही कल झुकू शकतो. भाजपला बिनशर्त पाठिंबा, एवढाच संदेश राज ठाकरे यांनी दिला आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर घडणाऱ्या घडामोडी येत्या काही दिवसात महत्वाच्या ठरू शकतील.