Join us

भाजप आमदारांनी मांडले प्रश्न, फडणवीस म्हणाले न्याय देऊ; मुंबईत भाजपची जोरदार तयारी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2023 6:14 AM

मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी रात्री सागर निवासस्थानी मुंबईतील भाजप आमदार, खासदारांची बैठक घेतली. तुम्ही मांडलेले प्रश्न सोडविण्याला माझे सर्वोच्च प्राधान्य असेल, अशी ग्वाही फडणवीस यांनी यावेळी आमदार, खासदारांना दिली. 

मुंबई भाजपचे अध्यक्ष आ. आशिष शेलार यांच्या आग्रहावरून ही बैठक झाली. बैठकीत आमदार, खासदारांनी मुंबईचे जिव्हाळ्याचे प्रश्न आणि आपापल्या मतदारसंघातील महत्त्वाचे प्रश्नदेखील मांडले. मुंबईतील ‘वर्ग ब’च्या जमिनींवर अनेक हाऊसिंग सोसायट्या उभ्या आहेत. या जमिनी ‘वर्ग अ’ करण्यासाठी रेडिरेकनरच्या १५ टक्के रक्कम आकारण्याऐवजी ५ टक्के रक्कम आकारावी ही मागणी या बैठकीत समोर आली. राज्य सरकारच्या विशेष पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये ज्यांची घरे जातात, त्यांना ३०० चौरस फुटांची पर्यायी घरे दिली जातात. महापालिकेच्या अशा प्रकल्पांमुळे बाधित झालेल्यांना पर्यायी घरे द्यावीत अन् ते शक्य नसेल तर ३०० चौरस फूट जमिनीच्या रेडीरेकनर दराच्या ७५ टक्के रक्कम भरपाई म्हणून द्यावी. सध्या घराच्या क्षेत्रफळाच्या आधारे भरपाई दिली जाते ती अगदीच कमी आहे, असा मुद्दाही मांडण्यात आला. 

यावेळी फडणवीस यांनी प्रत्येकाचे म्हणणे स्वत: नोंदवून घेतले. यावर निश्चितपणे कार्यवाही केली जाईल व त्याचे परिणाम तुम्हाला नजीकच्या काळात दिसतील असे त्यांनी आश्वस्त केले. तसेच महत्त्वाच्या विषयांची यादी काढून ते मार्गी लावण्यासाठी काही आमदार, खासदारांवर जबाबदारी देण्यात आली.

निवडणूक केव्हा होणार? 

मुंबई महापालिकेची निवडणूक केव्हा होणार याबाबत मात्र फडणवीस यांनी बैठकीत कोणतेही संकेत दिले नाहीत. निवडणूक कधीही होईल या दृष्टीनेच सज्ज राहा, असे ते म्हणाले. मुळात ही बैठक निवडणुकीच्या दृष्टीने नाही, तर मुंबईकरांना भेडसावणारे प्रश्न, ते तातडीने कसे सोडवायचे यासाठी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

 

टॅग्स :देवेंद्र फडणवीसमुंबई महापालिका निवडणूक २०२२भाजपा