मुंबई: अभ्यासक्रमाची गुणवत्ता सुधारण्याच्या प्रयत्नात असलेल्या राज्य शिक्षण मंडळाने दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी कृतिपत्रिका सुरू केल्या आहेत. अभ्यासातील ज्ञानरचनावाद परीक्षेतही यावा, या उद्देशाने राज्य सरकारने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला.मात्र, आधीच परीक्षेला घाबरलेल्या विद्यार्थ्यांचा कृतिपत्रिकेच्या स्वरूपाने आणखीनच गोंधळ उडतो. तो कमी व्हावा, या उद्देशाने किमान शिक्षण विभागाने कृतिपत्रिकेतच उत्तरपत्रिकेची व्यवस्था करावी, अशी मागणी शिक्षक भारतीने केली आहे. शिक्षक भारतीचे संयुक्त कार्यवाह चंद्रकांत म्हात्रे यांनी आपण या संदर्भात शिक्षणमंत्र्यांकडे पाठपुरावा करत असल्याची माहिती दिली.गेल्या २ वर्षांपासून राज्य शिक्षण मंडळाने कृतिपत्रिका सुरू केली आहे. त्या कृतिपत्रिकेत ठरावीक प्रकारच्या आकृत्या चौकानी, आयताकृती, त्रिकोणी अशा प्रकारच्या काढायच्या असतात. यामुळे बहुसंख्य विद्यार्थ्यांची अडचण होते.शिवाय भाषा विषयाचा पेपर म्हटले की, निबंध, पत्रलेखन, गोष्ट लेखन, वृत्तांत लेखन, जाहिरात इत्यादी प्रकारच्या प्रश्नांमध्ये खूप वेळ जातो. मग पेपर पूर्ण सोडवायचा की, उत्तरे सोडविण्यासाठी आकृत्या काढायच्या असतात. या गडबडडीत विद्यार्थ्यांचा पेपर अर्धवट राहतो आणि त्याचा थेट परिणाम निकालावर होतो.>काय आहे कृतिपत्रिका?पाठामधील माहितीच्या आधारे प्रश्न विचारण्याऐवजी विद्यार्थ्यांना माहितीचा वापर करावा लागेल, असे प्रश्नांचे स्वरूप असते. इतिहासात संकल्पना चित्र पूर्ण करणे, घटना कालानुक्रमे मांडता येणे, घटनांमधील संदर्भाच्या अनुषंगाने ओघतक्ता तयार करता येणे, उताऱ्यावरील प्रश्न, घटनांच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना मत मांडता येईल, असे प्रश्न यामध्ये असतात. संकल्पनांबरोबरच अनुभवावर आधारित प्रश्न कृतिपत्रिकेत आहेत.
दहावी, बारावीसाठी प्रश्न व उत्तरपत्रिका एकच असावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 4:41 AM