समितीची स्थापना; तंत्रनिकेतनच्या आवारातच राहणार उभी डीटीई, सीईटी, एफआरएची कार्यालये
सीमा महांगडे
मुंबई : विद्यार्थी व पालकांना उच्च शिक्षणातील व्यावसायिक आणि बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांची माहिती लवकरच एकाच ठिकाणी मिळणार असून, त्यांच्या तक्रारी व समस्य़ांचे निराकरण, प्रवेशासंदर्भातील माहिती एकाच ठिकाणी मिळेल. राज्य तंत्रशिक्षण मंडळ, शुल्क नियामक प्राधिकरण, राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ या विद्यार्थी, पालकांसाठी आवश्यक व महत्त्वाच्या इमारती एकाच शैक्षणिक संकुलात आणण्याचा प्रयत्न उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून सुरू आहे.
शासकीय तंत्रनिकेतनच्या आवारात स्वतंत्र इमारती बांधण्याच्या सूचना उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांनी दिल्या आहेत. सर्व लाभार्थींच्या आवश्यकता जाणून घेण्यासाठी व त्यांच्याकडून शक्य अशा आर्थिक सहभागाद्वारे सदर जागेचा विकास करण्याची कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी ७ सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. विद्यार्थीहिताचा विचार करून उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी व्यावसायिक आणि इतर अभ्यासक्रमांशी संबंधित संस्था एकाच छताखाली आणण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. त्याच दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला.
या सात सदस्यीय समितीचे अध्यक्ष राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाचे आयुक्त असतील. याबाबतचा प्रस्ताव राज्य तंत्रशिक्षण मंडळाने सरकारला सादर केला. ज्या लाभार्थी संस्थांचा विकास शासकीय तंत्रनिकेतनच्या आवारात करायचा आहे, त्यांच्या कार्यालयांच्या भविष्यातील कामकाजाच्या जागाविषयक गरजा लक्षात घेऊन बांधकामाची कार्यपद्धती ही समिती ठरवेल. या इमारत बांधणीचे काम लाभार्थी संस्थांच्या आर्थिक सहभागातून हाेईल. प्रत्येक यंत्रणेला त्यांच्या आवश्यक गरजा व जागेप्रमाणे एकूण प्रकल्प खर्चाच्या किती निधीचे योगदान देय आहे, याची दर निश्चिती समिती करेल. हा अहवाल समितीला ३ महिन्यांच्या आत सरकारला सादर करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
यांचा असेल समितीत सहभाग
सीईटी सेल आयुक्त अध्यक्ष असलेल्या या ७ सदस्यांच्या समितीमध्ये सदस्य म्हणून नियामक प्राधिकरणाचे सचिव, तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे प्रबंधक, सी. ए. पी. व्ही. पागे या संस्थेचे वित्तीय सल्लगार, सार्वजनिक बांधकाम विभाग, अंधेरीचे कार्यकारी अभियंता काम पाहतील. याशिवाय महाराष्ट्र तंत्रशिक्षण मंडळाचे संचालक सदस्य सचिवपदी असतील.
* तक्रारींचा निपटारा करणे शक्य
विद्यार्थी आणि पालकांना, त्यांचे शैक्षणिक प्रश्न सोडविण्यासाठी विविध ठिकाणी फेऱ्या मारण्याची गरज पडू नये, यादृष्टीने एकाच संकुलात ही कार्यालये स्थापन करावीत. तसेच यात उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे सचिव, एमएमबीटीई तसेच डीटीईचे संचालक, सीईटी सेलचे आयुक्त महिन्यातून आवश्यकतेप्रमाणे हजर राहतील व तक्रारींचा निपटारा करता येईल, हा यामागील उद्देश असल्याचे सीईटी सेलचे आयुक्त चिंतामण जोशी यांनी स्पष्ट केले.
...............................