मुंबई : इंदू मिल येथील डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकात सर्व सोयी-सुविधा कायमस्वरूपी निर्माण करण्यात येतील़ त्यामुळे आंबेडकरी अनुयायांना महापरिनिर्वाण दिनी रांग लावावी लागणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे़डॉ़ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचा २० वा वर्धापन दिन नुकताच परळ, भोईवाडा येथे संपन्न झाला़ यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.
पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, डॉ़ आंबेडकर यांचे इंदू मिल येथील स्मारक २०२० पर्यंत पूर्ण करण्यात येईल़ हे स्मारक आंतरराष्ट्रीय दर्जाचे असेल़ या स्मारकामुळे मुंबईला नवीन ओळख मिळेल़ स्मारकात सर्व सोयी-सुविधा उपलब्ध केल्या जातील़ जेणेकरून आंबेडकरी अनुयायांची गैरसोय होणार नाही़ नागपूर येथील दीक्षाभूमीसाठी १०० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत़ त्यातील ४० कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे़ महापरिनिर्वाण दिनी समिती चांगल्या प्रकारे काम करत आहे, अशी शाबासकीही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली़ चैत्यभूमी येथे येणाऱ्या आंबेडकरी अनुयायांना राज्य शासनाने दर्जेदार सुविधा द्याव्यात व त्यांची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे यांनी केले़ यावेळी डॉ़ बाबासाहेब आंबेडकर समाज उत्थान पुरस्कार प्राप्त शशिकांत बर्वे व इतर मान्यवर उपस्थित होते़