एफडीएच्या लॅबमध्ये लागली खाद्यपदार्थांच्या नमुन्यांची रांग
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2023 10:56 AM2023-11-23T10:56:55+5:302023-11-23T10:57:12+5:30
अहवाल येण्यासाठी मार्च महिना उजाडणार
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : शहर, उपनगरात सण-उत्सवांच्या काळात भेसळयुक्त पदार्थांवर अन्न व औषध प्रशासनाकडून (एफडीए) कारवाई करण्यात येते. तसेच प्रतिबंधित अन्नपदार्थांच्या साठ्यावरही कारवाई केल्यास जप्त केलेल्या साठ्यातील नमुने तपासणीसाठी घेतले जातात. गणेशोत्सव, नवरात्र आणि त्यानंतर दिवाळीच्या कालावधीत एफडीएच्या अधिकाऱ्यांनी विश्लेषणासाठी घेतलेल्या नमुन्यांची प्रयोगशाळेत रांग लागली आहे. त्यामुळे संबंधितांवर कारवाईसाठी एफडीएच्या अधिकाऱ्यांना ताटकळत राहावे लागणार आहे. प्रतिबंधित अन्नपदार्थ वा जप्त केलेल्या खाद्यपदार्थांमध्ये दोष आढळल्यास त्या संदर्भातील अहवाल प्रयोगशाळेद्वारे एफडीएला सादर केले जातात. त्यानंतर संबंधित आस्थापना वा दुकानावर तातडीने कठोर कारवाई केली जाते.
साधारणत: ४५० हून अधिक नमुने
एफडीएच्या प्रयोगशाळेत सण, उत्सवाच्या काळात तसेच नियमित कारवायांदरम्यान विश्लेषणासाठी घेण्यात आलेले तब्बल ४५० हून अधिक नमुने तपासणीसाठी प्रलंबित आहेत. न
मुन्यांची अधिक संख्या, अपुरे मनुष्यबळ या विविध कारणांमुळे अहवाल येण्यासाठी महिनोंमहिन्यांचा कालावधी लागत आहे.
अहवालानंतरच कारवाई :
दंडात्मक कारवाई वा काम थांबविणे आणि परवाना रद्द करणे, असे कारवाईचे स्वरूप आहे.
एफडीएच्या अपुऱ्या मनुष्यबळावर लवकरच शासनाकडून कार्यवाही करण्यात येणार असून, मनुष्यबळाची भरती करण्यात येणार आहे. त्यामुळे लवकरच विभाग सक्षम होईल, सर्वसामान्यांच्या अन्न व औषध सुरक्षेची जबाबदारी पार पडू शकेल. विभागातील त्रुटींवर मार्ग काढून अहवाल मागवून दुकाने व आस्थापनांवर कारवाई करणार आहे.
- शैलेश आढाव, सहआयुक्त, अन्न व औषध प्रशासन विभाग
मार्चपर्यंत प्रतीक्षा
सण- उत्सवाच्या कालावधीतील नमुन्यांचे अहवाल कधी येणार याविषयी अधिकाऱ्यांना विचारले असता, प्रयोगशाळेत अन्य नमुन्यांची तपासणी सुरू असल्याने अहवाल कधी येईल, हे निश्चितपणे सांगता येणार नाही, असे उत्तर मिळाले, तर एका अन्न सुरक्षा अधिकाऱ्याने हे अहवाल येण्यासाठी मार्च महिना उजाडणार असल्याचे सांगितले.