मुंबई : लोकल गाड्यांना असणारी गर्दी कमी व्हावी, लोकलमधून पडून होणारे अपघात रोखता यावेत यासाठी मध्य रेल्वेकडून आता अनेक उपाय शोधले जात आहेत. प्रशासन जलद लोकलचे थांबे वाढविण्याचा विचार करत असल्याचे रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. जलद लोकल गाड्यांचे थांबे वाढवल्यास प्रवास सुकर होईल, असे मत त्यांनी मांडले. डोंबिवलीतील भावेश नकातेचा गर्दीमुळे लोकलमधून पडून नुकताच मृत्यू झाला. त्याची दखल घेत मुंबई शहर व उपनगरात होणारे रेल्वे अपघात रोखण्याच्या दृष्टीने उपाययोजना आखण्यासाठी समिती स्थापन करण्याचे निर्देश देण्यात आले. मध्य रेल्वेवर सध्या ज्या स्थानकांवर जलद लोकल गाड्यांना थांबा आहे, त्यात परळ आणि विक्रोळी स्थानकाचाही समावेश करण्याचा विचार सध्या सुरू असल्याचे अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले. परळ आणि विक्रोळी स्थानकात सकाळी व संध्याकाळी बरीच गर्दी असते. जलद लोकल गाडीला या दोन्ही स्थानकांवर थांबा मिळाल्यास या स्थानकातून धिमी लोकल पकडणारेही जलद लोकल गाडीत चढतील, प्रवास करतील आणि जलद मार्गावरील स्थानकात उतरू शकतील. परळ स्थानकातील अनेक प्रवासी दादरला उतरून जलद लोकल पकडतात, तर विक्रोळी स्थानकातील प्रवासी घाटकोपरला जाऊन जलद लोकल पकडतात. त्यामुळे धिम्या लोकल गाड्यांना बरीच गर्दी होते. प्रवाशांची बरीच धावपळही उडते. त्यामुळे या दोन्ही स्थानकांत जलद लोकल गाड्यांना थांबा मिळाल्यास प्रवाशांना फायदा होईल, असे अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले. गर्दीच्या वेळेतच हे थांबे देण्यात येतील. या दोन स्थानकांव्यतिरिक्त कल्याणपुढील डाऊन दिशेला असणाऱ्या काही गर्दीच्या स्थानकांवरही थांबा देण्याचा विचार केला जात आहे. (प्रतिनिधी)>>>> जलदला गर्दी वाढणार नाहीथांबा वाढविल्यास जलद लोकल गाड्यांना गर्दी होणार नसल्याचा दावा रेल्वे अधिकारी करत आहेत. सध्या गर्दीच्या वेळेत एकामागोमाग एक जलद लोकल आहेत. त्यामुळे या दोन्ही स्थानकांतून प्रवासी चढल्यास त्या स्थानकातील बराचसा भार कमी होईल व त्या स्थानकातून धिम्या लोकल गाड्या पकडण्यासाठी धावपळही उडणार नाही.
गर्दीवर ‘जलद’चा उतारा
By admin | Published: December 11, 2015 1:46 AM