मुंबई : गेल्या आठवड्यात आगीच्या भक्षस्थानी पडलेल्या प्रसिद्ध आर. के. स्टुडिओचे ना हरकत प्रमाणपत्र मुंबई अग्निशमन दलाने रद्द केले आहे. २०१४मध्ये पालिकेने या स्टुडिओला ना हरकत प्रमाणपत्र दिले होते. मात्र आगीच्या दुर्घटनेदरम्यान या ठिकाणी असलेले अग्निरोधक यंत्र बंद असल्याचे उजेडात आले. यामुळे संबंधितांना नोटीस बजावत यापुढे शूटिंग बंद करण्यात आले आहे.१६ सप्टेंबर रोजी आर. के. स्टुडिओला आग लागली होती. सुरुवातीला किरकोळ वाटणाºया या आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केले.अग्निशमन विभागाने २०१४मध्ये या स्टुडिओला अग्निरोधक यंत्रणा कार्यान्वित ठेवण्यासाठी नोटीस बजावली होती. मात्र याची दखल घेऊन स्टुडिओमध्ये खबरदारीचे उपाय करण्यात आले नव्हते. त्यामुळे गेल्या शनिवारी स्टुडिओमध्ये शॉर्टसर्किटमुळे आग लागली तेव्हा अग्निरोधक यंत्रणा कार्यान्वित नव्हत्या. परिणामी, अग्निशमन दलाला आग आटोक्यात आणण्यास जास्त अवधी लागला. दरम्यान, शूटिंगसाठी ठेवलेले सामान जळून खाक झाले.शूटिंग बंद : या आगीत स्टुडिओमधील फर्निचर, इलेक्ट्रीक सामान, डेकोरेशनचे सामान नष्ट झाले. अग्निशमन दलाने या दुर्घटनेची चौकशी केली असता २०१४मध्येच दलाने स्टुडिओला अग्निरोधक यंत्रणा सुरू करण्याच्या अटीवर ना हरकत प्रमाणपत्र दिले होते; मात्र यावर स्टुडिओ चालकाने कोणतीच पावले उचलली नाहीत हे स्पष्ट झाले. त्यामुळे परवाना रद्द होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या स्टुडिओत यापुढे कोणतेच शूटिंग होणार नाही.
आर. के. स्टुडिओला नोटीस, ना हरकत प्रमाणपत्र रद्द, फौजदारी कारवाईचे संकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 4:48 AM