आर/उत्तर कार्यालय पाण्याखाली
By Admin | Published: June 26, 2017 01:52 AM2017-06-26T01:52:25+5:302017-06-26T01:52:25+5:30
पावसाळ्यापूर्वी १०० टक्के नालेसफाई झाली असल्याचा मुंबई महानगर पालिकेचा दावा रविवारी फोल ठरला. दमदार पावसामुळे चक्क पालिकेच्या दहिसर
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पावसाळ्यापूर्वी १०० टक्के नालेसफाई झाली असल्याचा मुंबई महानगर पालिकेचा दावा रविवारी फोल ठरला. दमदार पावसामुळे चक्क पालिकेच्या दहिसर पश्चिम येथील आर/उत्तर विभाग कार्यालयाच्या अंगणातच पाणी आले.
मुंबई महानगर पालिकेने २००१ साली बोरिवली आणि दहिसर करिता स्वतंत्र आर/मध्य आणि आर/उत्तर अशी दोन स्वतंत्र विभाग कार्यालय सुरू केली. मुंबईचे माजी महापौर हरेश्वर पाटील यांनी दहिसरसाठी स्वतंत्र विभाग कार्यालय हवे; यासाठी सातत्याने प्रयतन करून अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद केली होती. त्यांच्या हस्ते दहिसर पूलाखाली असलेल्या या विभाग कार्यालयाचे लोकार्पण झाले होते. पण रविवारी झालेल्या दमदार पावसामुळे चक्क या कार्यालयात पाणी शिरले होते. पण रविवार असल्यामुळे कार्यालय बंद होते. त्यामुळे कार्यालयीन कामकाजावर कोणताही परिणाम झाला नाही.
पुलाखाली कार्यालय कसे?
रविवारी पश्चिम उपनगरात पडलेला पाऊस आणि विशेष म्हणजे आर/उत्तर विभाग कार्यालय हे पूलाखाली असल्यामुळे पूलावरून येणारे पाणी आणि पावसाचे पाणी यामुळे येथे पाणी तुंबले, अशी माहिती आर/मध्य आणि आर/उत्तरच्या प्रभाग समिती अध्यक्ष शीतल मुकेश म्हात्रे यांनी दिली.
पूलाखाली कुठे विभाग कार्यालय असते का? असा सवाल करून खरे तर येथे विभाग कार्यालयासाठी स्वतंत्र इमारत बांधणे गरजेचे आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. अंधेरी पूर्व येथील गोखले पूलाखाली पूर्वी के/पूर्व विभाग कार्यालय होते. नंतर २००१ साली येथे विभाग कार्यालयासाठी जशी स्वतंत्र इमारत बांधण्यात आली; तशी येथे त्यावेळी का बांधली नाही? असा सवाल त्यांनी केला.