'बॉलिवूड गँग'वरून वाद वाढू लागताच रेहमान यांचं ट्विट; म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2020 09:44 PM2020-07-26T21:44:58+5:302020-07-26T22:03:00+5:30
शेखर कपूर यांचं ट्विट ए. आर. रेहमान यांच्याकडून रिट्विट
मुंबई: अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील घराणेशाही आणि कंपूशाहीचा विषय चर्चेत आला आहे. गॉडफादर नसलेल्या कलाकारांना मिळणारी वागणूक आणि प्रस्थापितांना मिळणारी विशेष वर्तणूक याबद्दल सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. बॉलिवूडमधल्या अनेकांनी यावर भाष्य केलं आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या संगीताचं नाणं अतिशय खणखणीत वाजवणाऱ्या संगीतकार ए. आर. रेहमान (A. R. Rahman) यांनीदेखील बॉलिवूडमधील गटबाजीवर व्यक्त होत त्यांना येत असलेल्या अडचणी बोलून दाखवल्या. यावर कालपासून अनेक कलाकारांनी प्रतिक्रिया दिल्या. मात्र आता या प्रकरणाला पूर्णविराम देण्याचा मानस रेहमान यांनी बोलून दाखवला आहे.
बॉलिवूडमधील एक टोळी माझं नुकसान करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे मला सध्या चांगले चित्रपट मिळत नाहीत, असा दावा रेहमान यांनी केला. त्यानंतर गेल्या २४ तासांत रेहमान यांच्या विधानावर अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या. मात्र हा वाद फार वाढू न देण्याचा प्रयत्न रेहमान करत असल्याचं त्यांच्या आताच्या ट्विटमधून दिसत आहे. दिग्दर्शक शेखर कपूर यांचं एक ट्विट रिट्विट करताना रेहमान यांनी या प्रकरणावर भाष्य केलं.
Lost Money comes back, fame comes back, but the wasted prime time of our lives will never come back. Peace! Lets move on. We have greater things to do😊 https://t.co/7oWnS4ATvB
— A.R.Rahman (@arrahman) July 26, 2020
गमावलेला पैसा, गमावलेला सन्मान परत मिळवता येऊ शकतो. मात्र आयुष्यातून गेलेला महत्त्वपूर्ण वेळ कधीही परत येऊ शकत नाही. शांती. चला, पुढे जाण्याची वेळ आली आहे. आपल्याकडे करण्यासारख्या चांगल्या गोष्टी आहेत, असं रेहमान यांनी कपूर यांचं ट्विट रिट्विट करताना म्हटलं आहे. शेखर कपूर यांनी त्यांच्या ट्विटमधून बॉलिवूडवर जबरदस्त निशाणा साधला होता. 'तुझी अडचण काय आहे, हे तुम्हाला माहित्येय का ए. आर. रेहमान? तू ऑस्कर पुरस्कार जिंकून आलास. हा पुरस्कार तुझ्यात प्रतिभा असल्याचं सिद्ध करतो. मात्र बॉलिवूडला ती हाताळता येत नाही,' अशा शब्दांत कपूर यांनी बॉलिवूडवर शरसंधान साधलं होतं.