मुंबई : भायखळ्यातील राणीबाग व पेंग्विन पाहण्याच्या शुल्कात वाढ करण्यास, महापालिकेच्या महासभेत मंजुरी मिळाली आहे. विरोधक व पहारेकºयांचा विरोधही तोकडा पडल्याने, नियमानुसार मंगळवार, १ आॅगस्टपासून राणीबागेत प्रवेश मिळविण्यासाठी जादा पैसे मोजावे लागणार आहेत.राणीबागेचे प्रवेश शुल्क १९९६ नंतर २००३ मध्ये वाढविण्यात आले. मात्र, त्यानंतरही मुलांसाठी प्रत्येकी २ रुपये आणि प्रौढांसाठी प्रत्येकी ५ रुपये दर होते. पेंग्विन आणल्यानंतर राणीबागेत पर्यटकांची प्रचंड गर्दी होऊ लागल्याने, दरवाढ करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. मात्र, या प्रस्तावाला सर्वच स्तरातून विरोध होता. या प्रस्तावाला गटनेत्यांच्या, तसेच बाजार व उद्यान समतीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.शिवसेनेच्या खेळीमुळे भाजपाला हा प्रस्ताव रोखता आला नाही. भाजपाचा विरोधही लटका पडल्याने, स्थायी समिती आणि पालिका महासभेची मंजुरी झटपट मिळाली. मात्र, मंजुरी मिळाल्यानंतरही त्या महिन्यानंतरच्या महिन्याच्या पहिल्या तारखेपासून ही शुल्कवाढ लागू करण्याचे ठरले. त्यानुसार, १ आॅगस्टपासून ही नवीन शुल्कवाढ लागू होत आहे.पेंग्विन आणल्यापासून दररोज १५ ते २० हजार पर्यटक राणीबागेत येतात. सुट्टीच्या दिवशी हा आकडा ३५ हजारांपर्यंत पोहोचतो, असा पालिकेचा दावा आहे. मात्र, राणीबागेत फार पूर्वीपासून दररोज आठ ते दहा हजार पर्यटक येत असतात, असे सामाजिक संस्थांनी निदर्शनास आणले आहे.
राणीबागेसह पेंग्विनचे दर्शन महागणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 12:08 AM