राजकीय नवरात्रोत्सवात कोट्यवधींचा रास गरबा; जागर अंबेमातेचा; पावती पूजनाचा नारळ फुटला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2023 12:03 PM2023-10-03T12:03:18+5:302023-10-03T12:06:12+5:30
सार्वजनिक मंडळांमधून देवीची स्थापना तसेच घरोघरी घटस्थापना केली जाते. तसेच गरबा दांडियाची तयारी शहरात जोमाने सुरू आहे.
मुंबई : गणेशोत्सवानंतर अवघ्या मुंबापुरीला आता नवरात्रोत्सवाचे वेध लागले असून, गणेश विसर्जनानंतरच्या शनिवारी, रविवारी बहुतांशी सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांनी पावती पूजनाचा नारळ फोडत नवरात्रीच्या नियोजनाचा श्रीगणेशा केला आहे. विशेषत: येणाऱ्या लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवत मंडळांनी आपापल्या कार्यक्रमांचे आराखडे तयार करण्यास सुरुवात केली आहे. या आराखड्यानुसार बहुतांशी कार्यक्रमांतून अधिकाधिक राजकीय सहभाग सक्रिय कसा राहील, यावरच मंडळांनी भर दिला आहे. सार्वजनिक मंडळांमधून देवीची स्थापना तसेच घरोघरी घटस्थापना केली जाते. तसेच गरबा दांडियाची तयारी शहरात जोमाने सुरू आहे.
गेट कोणाचे लावायचे ?
खासदार, आमदार आणि माजी नगरसेवकांपासून निवडणुकीसाठी इच्छुकांकडे आता कार्यकर्ते दाखल होत आहेत. दीड ते पावणेदोन लाख बजेट असलेल्या मंडळाने किमान तीन गेट लावण्यावर भर दिला आहे.
दगडी चाळ
दक्षिण मुंबईत भायखळ्यातील दगडी चाळीपासून चिंचपोकळीतल्या सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळापर्यंत ते पश्चिम उपनगरात रंगणाऱ्या दांडिया क्वीनच्या गरब्याची तयारी वेगाने सुरू झाली आहे.
पुरोहितही बुक झाले
प्रत्येक मंडळाच्या पुरोहिताचे बुकिंग झाले असून, प्रतिष्ठापनेपासून होमहवनपर्यंतच्या साहित्याची जुळवाजुळवा करण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांनी पुरोहिताने दिलेल्या यादीनुसार वाटून घेतली आहे.
कार्यकर्त्यांना कामाचे वाटप
गेल्या काही वर्षांपासून कार्यकर्त्यांची संख्या तुलनेने कमी होत आहे.
मंडळामध्ये भरभरून कार्यकर्त्यांची गर्दी असली तरी काम करणारे कार्यकर्ते हे हाताच्या बोटावर मोजण्याइतपत आहेत.
त्यामुळे मंडळाच्या बैठकीत प्रत्येक कार्यकर्त्याला कामाचे वाटप करून देण्यात येत आहे.
आर्टिफिशल सजावट
देवीच्या मंडपाची आर्टिफिशल सजावट करायची की रंगीबेरंगी पडदे लावायचे, यावरही मंडळाच्या बैठकीत चर्चा झाली असून, कार्यकर्त्यांनी झगमगाट करण्यापेक्षा साध्या सजावटीला प्राधान्य दिले आहे.
वर्गणी किती घ्यायची?
आता पूर्वीसारखी घराघरातून वर्गणी गोळा होत नाही. विशेषत: कोरोनानंतर यात घट झाली आहे.
त्यामुळे इच्छेनुसार वर्गणीदारांकडून वर्गणी घेण्यावर मंडळाच्या बैठकीत एकमत झाले आहे.
यात ५१, १०१, २५१, ५०१ रुपये अशा वर्गणीचा समावेश आहे.
परवानगीसाठी धावपळ
महापालिका, पोलिस आणि वाहतूक पोलिसांकडून मंडळांना परवानगी घ्यावी लागते.
यात मंडपापासून शिस्तबद्ध कार्यक्रम आखण्यापर्यंत आणि आगमनासह विसर्जनापर्यंतचा मार्ग यंत्रणांना कळवावा लागतो.
परवानग्यांसाठी कार्यकर्त्यांची धावपळ सुरू झाली आहे.