मुंबई : भटक्या व पाळीव प्राण्यांच्या दंशानंतर होऊ शकणारा रेबीज आजार हा प्राणघातक असून, त्याचा प्रतिबंध अतिशय महत्त्वाचा असतो. या पार्श्वभूमीवर रेबीज प्रतिबंधासाठी पालिका दवाखान्यांमध्ये सोमवार ते शनिवार सकाळी ९ ते ४ या पहिल्या सत्रात रेबीज लसीकरण उपलब्ध असते. मात्र, आतापर्यंत ते फक्त एका सत्रातच उपलब्ध होते. यापुढे आता निवडक दवाखान्यांमध्येही दुसऱ्या सत्रात म्हणजे दुपारी ४ ते १० या वेळेत रेबीज प्रतिबंधक लस रुग्णांना उपलब्ध करून देण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. एवढेच नव्हे तर, रेबीज आजार नियंत्रणाच्या दृष्टिने सुमारे ३०० पेक्षा अधिक वैद्यकीय अधिकाऱ्यांना तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत प्रशिक्षणही देण्यात आले आहे.
रेबीज हा शंभर टक्के प्राणघातक आजार असल्यामुळे त्याचा प्रतिबंध करणे अत्यंत महत्त्वाचे असते व त्याकरिता योग्य वेळेत लसीकरण हा एकमेव उपचार आहे.
२०३० पर्यंत रेबीज या रोगाचे निर्मूलन करण्याचे उद्दिष्ट केंद्र सरकारने निश्चित केले आहे. यात भटक्या, तसेच पाळीव प्राण्यांचे रेबीज प्रतिबंधक लसीकरण, भटक्या श्वानांचे निर्बीजीकरण अशा व्यापक उपाययोजना करायच्या आहेत. या धर्तीवर, पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याने आपल्या स्तरावरील उपाययोजनांची आखणी केली आहे.
वैद्यकीय अधिकाऱ्यांना तज्ज्ञांकडून प्रशिक्षण
यंदाच्या जागतिक रेबीज दिनानिमित्ताने पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्यातर्फे ३०० हून अधिक वैद्यकीय अधिकाऱ्यांना रेबीजच्या नियंत्रणासंबंधी तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत प्रशिक्षणही देण्यात आल्याची माहिती कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शाह यांनी दिली.
जर एखाद्या प्राण्याने चावा घेतला तर..
१५ मिनिटे साबण आणि पाण्याने जखम स्वच्छ धुवा.
त्वरित उपचार केल्यास रेबीजचे संक्रमण टाळता येते.
रेबीज प्रतिबंधक लसीकरणामध्ये त्वचेखाली दोन्ही दंडावर लसीची १ मात्रा इंजेक्शनद्वारे ०, ३, ७ आणि २८ व्या दिवशी देण्यात येते.
संभाव्य रेबीज संक्रमित झालेल्या प्राण्यांशी संपर्क टाळा आणि त्यांना हाताळण्याचा किंवा खाऊ घालण्याचा प्रयत्न करू नका.