लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई: ‘रेबीजमुक्त मुंबई’साठी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने उपक्रम हाती घेण्यात आला आहे. पालिका आणि १५ स्वयंसेवी संस्थांच्या वतीने पालिका क्षेत्रातील ६ प्रशासकीय विभागातील १५ हजार भटक्या कुत्र्यांचे रेबीज लसीकरण करण्यात येणार आहे. लसीकरणानंतर प्रायोगिक तत्त्वावर काही भटक्या श्वानांच्या गळ्यात ‘क्यू आर कोड’ असलेले ‘कॉलर’ घालण्यात येणार आहेत. परिणामी, क्यू आर कोड स्कॅन केल्यावर श्वानाच्या माहितीसह त्याला खाद्य देणाऱ्याचा (फिडर) तपशील, लसीकरण आणि वैद्यकीय माहिती प्राप्त होण्यास मदत मिळणार आहे. हे लसीकरण मोबाईल ॲप आधारित होणार आहे. राज्यात पहिल्यांदाच मोबाईल ॲप आधारित रेबीज लसीकरण करणार आहे.
२८ सप्टेंबर २०२३ रोजीच्या आंतरराष्ट्रीय रेबीज दिवसाचे औचित्य साधून मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ‘रेबीजमुक्त मुंबई’ करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. त्यासाठी विविध स्वयंसेवी संस्थांची मदत घेतली जात आहे. याचाच एक भाग म्हणून मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय, मुंबई शहर वाहतूक विभाग, बोरिजर इंगलहाईम, पेट प्रॅक्टिशनर्स असोसिएशन ऑफ मुंबई या स्वयंसेवी संस्थेसह इतर १५ स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने २९ सप्टेंबर २०२३ ते १० ऑक्टोबर २०२३ या १० दिवसांच्या कालावधीत पी उत्तर, आर दक्षिण, आर मध्य, आर उत्तर, एस आणि टी विभागातील जवळपास १५ हजार भटक्या श्वानांचे रेबीज लसीकरण करण्यात येणार आहे. यासाठी १०० कर्मचारी कार्यरत असणार आहेत. केवळ लसीकरणावर न थांबता कुत्र्यांच्या आरोग्यासाठी उपाययोजनादेखील राबविणार आहे.
उपक्रमासाठी संस्थांची मदतया उपक्रमासाठी, मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय, द वेलफेअर ऑफ स्ट्रे डॉग्स, मिशन रेबीज, वर्ल्ड वाइल्ड वेटरनरी सर्व्हिस, बाई सक्करबाई दिनशॉ पेटिट प्राण्यांचे रुग्णालय, अहिंसा, जीवदया अभियान, मुंबई ॲनिमल असोसिएशन, इन डिफेन्स ऑफ ॲनिमल, यूथ ऑर्गनायझेशन इन डिफेन्स ऑफ ॲनिमल, उत्कर्षा ग्लोबल फाउंडेशन, ॲनिमल मॅटर्स टू मी, जीवरक्षा ॲनिमल वेलफेअर ट्रस्ट, जेनिस स्मिथ ट्रस्ट, वर्क फॉर केअर ॲनिमल फाउंडेशन आणि युनिव्हर्सल ॲनिमल वेल्फेअर सोसायटी या स्वयंसेवी संस्था निःशुल्क सेवा देत आहेत. तसेच बोरिजर इंगलहाईम ही संस्था मोफत लस पुरवठा करणार आहे.
२०२४ मध्ये होणार सर्वेक्षण २०१४ मधील सर्वेक्षणानुसार, मुंबईमध्ये सुमारे ९५ हजार भटके श्वान होते. ती संख्या आता सुमारे १ लाख ६४ हजारांवर पोहोचल्याचा अंदाज आहे. या भटक्या श्वानांना रेबीज या रोगाची लागण होऊ नये तसेच त्यापासून नागरिकांना त्रास होऊ नये, यासाठी त्यांना रेबीज प्रतिबंधक लस देणे गरजेचे असते. याच पार्श्वभूमीवर पालिकेच्या वतीने भटक्या श्वानांच्या लसीकरणाचा उपक्रम आधीपासूनच सुरू आहे. दर दहा वर्षांनी श्वान गणना होते. त्यानुसार जानेवारी २०२४ मध्ये मुंबईतील भटक्या श्वानांचे सर्वेक्षण प्रस्तावित आहे. सुमारे १ लाख भटक्या श्वानांना रेबीज प्रतिबंधक लस देण्याचे नियोजन आहे.
मोबाईल ॲपच्या माध्यमातून भटक्या श्वानांची माहिती एकत्रित केली जाणार आहे. त्यानंतर स्वयंसेवी संस्थांच्या सहायाने श्वानांचे रेबीज लसीकरण करण्यात येणार आहे. तसेच, प्राथमिक आरोग्य तपासणीदेखील करण्यात येणार आहे. त्याची माहिती या मोबाईल ॲपमध्ये एकत्रित असेल. यापुढील काळातही ही मोहीम सुरू राहणार आहे. - डॉ. कलीमपाशा पठाण, महाव्यवस्थापक, देवनार पशुवधगृह, पशुवैद्यकीय आरोग्य खात्याचे प्रमुख