Join us

भटक्या कुत्र्यांच्या रेबीज लसीकरणाने पकडला वेग

By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2020 4:01 PM

Stray Dogs : मुंबईभर भटक्या कुत्र्यांसाठी रेबीज लसीकरण मोहीम

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरातील भटक्या श्वानांचा त्रास होऊ नये, श्वानांच्या दंशाने त्रासाला सामोरे जावे लागू नये याकरिता मुंबई महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाकडून मुंबईभर भटक्या कुत्र्यांसाठी रेबीज लसीकरण मोहीम आयोजित करण्यात आली असून, त्या अंतर्गत विविध ठिकाणी भटक्या कुत्र्यांचे रेबीज लसीकरण वेगाने सुरु आहे. विशेषत: कुर्ला, भांडूपसह लगतच्या परिसरात देखील या मोहीमेने वेग पकडला आहे. दरम्यान, २८ सप्टेंबरपासून सुरु झालेली ही मोहीम १० ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे.

मुंबई महापालिकेने या मोहीमे अंतर्गत रहिवाशांना माहिती कळविण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार, एखाद्या नागरिकाला आपल्या परिसरात ही मोहीम राबवायची असल्यास महापालिकेला सांगितले तर प्रशासनाची टिम दाखल होत भटक्या कुत्र्यांचे लसीकरण करत आहे. त्यानुसार, कुर्ला येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक संजय तुर्डे यांनी आपल्या परिसरात ही मोहीम राबवायची आहे, असे महापालिकेला सांगितले. यावर महापालिकेची टिम येथे दाखल होत गेल्या दोन दिवसांपासून भटक्यांना कुत्र्यांना रेबीज लस देत आहेत. आतापर्यंत वाडीया इस्टेट, सहकार चाळ, समर्थ चाळ, शिंगरे वाडी, अल्मेडा बाग अशा काहीशा परिसरातील ६० हून अधिक भटक्या कुत्र्यांना रेबीज लस देण्यात आल्याचे रस्ते, आस्थापना एल विभाग संघटक मनिष येलकर यांनी सांगितले. महापालिकेच्या टिमला पुर्णपणे सहकार्य केले जात असून, येथील उर्वरित परिसरात देखील ही मोहीम राबविला जाणार आहे.

भांडूप येथील अम्मा केअर आणि प्लँट अँड अ‍ॅनिमल वेल्फेअर सोसायटीतर्फे देखील भटक्या कुत्र्यांसाठी रेबीज लसीकरण मोहीम आयोजित करण्यात आली. फेडरेशन ऑफ इंडियन अ‍ॅनिमल प्रोटेक्शन ऑर्गनायझेशनच्या संयुक्त विद्यमाने मुंबईसह ठाण्यातही ही मोहीम आयोजित करण्यात आली. नि:शुल्क मोहीमे अंतर्गत मुंबई आणि मीरा-भाईंदर परिसरामध्ये मानद जिल्हा पशु कल्याण अधिकारी सुनीश सुब्रमण्यम यांच्या देखरेखीखाली पशुवैद्य डॉ. मनीष पिंगळे आणि डॉ. राहुल मेश्राम यांच्या सहकार्याने जवळपास ३०० भटक्या कुत्र्यांचे लसीकरण करण्यात आले. स्थानिक प्राणी प्रेमी आणि भटक्या कुत्र्यांना खाण्यास देणा-या लोकांना यासाठी मदत केली. आणि ही मोहीम संस्थेतर्फेच राबविण्यात आली होती, असे निशा कुंजू यांनी सांगितले.  

टॅग्स :मुंबई महानगरपालिकाकुत्रामुंबईठाणेआरोग्य