ऑगस्टनंतर उघडणार रवींद्र नाट्य मंदिरचा पडदा, तीन नवीन लिफ्ट बसवणार; पावसाळ्यात करणार अंतर्गत कामे
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2024 12:05 PM2024-06-14T12:05:08+5:302024-06-14T12:06:45+5:30
Rabindra Natya Mandir : नूतनीकरणाच्या कामासाठी मागील जवळपास आठ महिन्यांपासून बंद असलेल्या रवींद्र नाट्य मंदिरमध्ये नाटक बघण्यासाठी आतुरलेल्या प्रेक्षकांना आणखी थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. यापूर्वी नाट्यमंदिर सुरू होण्याचा मुहूर्त दोनदा हुकला आहे.
मुंबई - नूतनीकरणाच्या कामासाठी मागील जवळपास आठ महिन्यांपासून बंद असलेल्या रवींद्र नाट्य मंदिरमध्ये नाटक बघण्यासाठी आतुरलेल्या प्रेक्षकांना आणखी थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. यापूर्वी नाट्यमंदिर सुरू होण्याचा मुहूर्त दोनदा हुकला आहे. सध्या सुरू असलेल्या कामाची गती आणि पावसाच्या आगमनामुळे रवींद्र नाट्य मंदिराचा पडदा ऑगस्टनंतर उघडेल, अशी माहिती ‘लोकमत’ला मिळाली आहे.
मागील वर्षी २५ ऑक्टोबरनंतर पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले होते. त्यामुळे आठ महिन्यांपासून रवींद्र नाट्य मंदिरामध्ये नाटकाचा एकाही प्रयोग झालेला नाही. सुरुवातीला मार्चपर्यंत संपूर्ण काम करून नाट्यगृह आणि अकादमीचा परिसर रसिकांसाठी खुला करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. पण, काम पूर्ण होऊ शकले नाही. त्यानंतर एप्रिल-मे महिन्यात वेगात कामे पूर्ण करून ३१ मेनंतर नाट्यगृह खुले करण्याचे उद्दिष्ट अकादमीचे होते. मात्र, अद्याप कामे सुरूच आहेत. अकादमीच्या कामाचा पसारा खूप मोठा असून, एकमेकांशी कनेक्टेड असलेली लहान-सहान कामे करण्यासाठीही खूप वेळ लागत असल्याचे अकादमीच्या व्यवस्थापनाकडून समजले आहे.
पावसाळ्यामुळे बाहेरील कामाला मर्यादा आल्या असून, अंतर्गत कामे वेगात केली जाणार आहेत. मुख्य आणि मिनी नाट्यगृहांसोबतच संपूर्ण इमारतीच्या वॅाटरप्रुफिंगचे काम केले गेले आहे. सहाव्या मजल्यापर्यंत ८० टक्के कामे पूर्ण झाली आहेत. दुसऱ्या मजल्यावर असलेली गानसम्राज्ञी लता मंगेशकर युनिव्हर्सिटी पहिल्या मजल्यावर शिफ्ट केल्यावर दुसऱ्या मजल्याचे काम हाती घेण्यात येईल. प्रशासकीय इमारतीचे काम बऱ्यापैकी पूर्ण झाले आहे. अकादमीचे कार्यालय, कलांगण तसेच मुख्य नाट्यगृहातील छताचे काम पूर्ण झाल्यावर रंगमंचावरील कामे, ऑडिओ, प्रकाश योजना तसेच खुर्च्या बसवण्याची कामे शेवटी करण्यात येतील.
लाकडी फ्रेम्स काढल्या
ऑडिओ कॅलिब्रेशनसाठी वेळ लागणार आहे. तीनही लिफ्ट नवीन बसवण्यात येणार आहेत. लिफ्ट आल्या असल्या तरी त्या बसविल्यानंतर महिनाभर तपासणी केली जाईल. पु. ल. देशपांडे यांच्या पुतळ्याची जागा बदलण्यात येणार आहे. मुख्य नाट्यगृहातील लाकडी फ्रेम्स काढून टाकल्या असून, फॉल सिलिंग, ॲकॉास्टिक्सचे काम बाकी आहे.