आग विझविण्यासाठी धावून येणार कोटीचा रोबो
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2019 01:42 AM2019-07-19T01:42:13+5:302019-07-19T01:42:21+5:30
मुंबईत आगीच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून काही वेळा आग विझविताना अग्निशमन दलाच्या जवानांच्या जीवावरही बेतत आहे.
मुंबई : मुंबईत आगीच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून काही वेळा आग विझविताना अग्निशमन दलाच्या जवानांच्या जीवावरही बेतत आहे. यासाठी धगधगत्या आगीत उडी घेऊन आगीवर नियंत्रण मिळविणारा अत्याधुनिक रोबो अग्निशमन दलात दाखल झाला आहे. अग्निशमन जवान पोहोचू शकत नाहीत तिथे या रोबोची मदत घेण्यात येणार आहे. यामुळे जीवित आणि वित्तहानी कमी होण्यास मदत होणार आहे. रोबोची किंमत सुमारे एक कोटी रुपये आहे.
हा देशातला पहिलाच रोबो आहे. या रोबोचे व प्रादेशिक समादेश केंद्राचे लोकार्पण युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झाले. फायर सेफ्टीचा काही मिनिटांचा व्हिडीओ तयार करून तो शाळा-कॉलेजांमध्ये दाखविला पाहिजे, असे मत आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले. या लोकार्पण सोहळ्यात महापौर विश्वनाथ महाडेश्वर, उपमहापौर हेमांगी वरळीकर, अग्निशमन अधिकारी प्रभात रहांगदळे आदी उपस्थित होते.
यासाठी घेतला रोबो...
आगीचा भडका उडाल्यानंतर प्रचंड उष्णतेमुळे जवान त्या ठिकाणी जाऊ शकत नाहीत. मात्र अग्निशमन दलात दाखल झालेला हा रोबो आगीच्या ज्वाळा, धुराचे लोळ, चिंचोळ्या गल्ल्या, बेसमेंटची आग अशा ठिकाणी थेट जाऊन आगीवर नियंत्रण मिळवू शकणार आहे. या रोबोवर कॉम्प्युटरच्या माध्यमातून सूचना देऊन काम करून घेतले जाणार आहे. हा रोबो अडगळीच्या ठिकाणी जाऊन आग विझवू शकणार असल्यामुळे आग भडकण्याचे प्रमाण कमी होणार आहे.
आगीवर नियंत्रण वेळेत शक्य
रोबोमध्ये असलेल्या कॅमेऱ्याच्या मदतीने घटनास्थळी असणारी आगीची तीव्रता समजण्यास मदत होणार आहे. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी उपाययोजना करणे शक्य होईल.
>कसा आहे हा रोबो?
रोबोची किंमत सुमारे एक कोटी रुपये आहे. रोबोचे वजन ४०० ते ५०० किलो आहे. रोबोतील थर्मल कॅमेरा धुरातही सर्व स्पष्ट दाखवेल. उष्ण तापमानात रोबो स्वत:चे संरक्षण करेल. रोबो बॅटरीवर चालणार असून पाण्याचे पाइप ओढणे, आग विझविणे असे अडथळे दूर करेल. सध्या इस्रायल, चीन, अमेरिका असे रोबो तयार करते. विमान बांधणीसाठी वापरण्यात येणाºया अॅल्युमिनियम पत्र्याच्या साहाय्याने त्याची निर्मिती करण्यात आली आहे. ७०० अंश सेल्सिअसच्या तापमानातही हा ‘जवान’ काम करू शकणार आहे. फ्रान्सच्या कंपनीने तयार केलेला हा रोबो ५५ मीटर उंचीपर्यंत पाण्याचा मारा करू शकतो. ३०० मीटरपर्यंत त्याचे रिमोटद्वारे नियंत्रण करणे शक्य आहे. यामध्ये कॅमेरा बसविण्यात आला असल्याने घटनास्थळाचाही अंदाज घेता येणार आहे.