Join us

बालनाट्य स्पर्धेत ‘रेस २’ सर्वोत्कृष्ट

By admin | Published: December 13, 2015 7:15 PM

परळच्या कामगार वस्तीतील नावाजलेल्या रविकिरण संस्थेची बालनाट्य स्पर्धा नुकतीच पार पडली. या स्पर्धेत कल्याणच्या सेक्रेट हार्ट स्कूलच्या

मुंबई : परळच्या कामगार वस्तीतील नावाजलेल्या रविकिरण संस्थेची बालनाट्य स्पर्धा नुकतीच पार पडली. या स्पर्धेत कल्याणच्या सेक्रेट हार्ट स्कूलच्या ‘रेस २’ या बालनाट्यास प्रथम पारितोषिक मिळाले. तसेच पार्ले टिळक विद्यालयाच्या ‘शिक्षा’ या बालनाट्यास द्वितीय तर डोंबिवली पूर्वेकडील स्वामी विवेकानंद विद्यामंदिरच्या ‘सुट्टी’ या बालनाट्यास तृतीय क्रमांक मिळाला आहे. तसेच डोंबिवली पश्चिम येथील स्वामी विवेकानंद विद्यामंदिरचे ‘भिंत’ आणि पुण्याच्या आकांक्षा बालरंगभूमीने सादर केलेल्या ‘किडनॅप’ या बालनाट्यास उत्तेजनार्थ म्हणून गौरविण्यात आले आहे. परळच्या दामोदर हॉलमध्ये पार पडलेल्या या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्याला अभिनेत्री ‘दिल दोस्ती दुनियादारी’ फेम (मीनल) स्वानंदी टिकेकर आणि सिनेनाट्य अभिनेत्री ऐश्वर्या नारकर उपस्थित होत्या. स्पर्धेचे परीक्षक म्हणून वामन तावडे, अनिल गवस आणि रेखा बडे यांनी काम पाहिले. स्पर्धेचे हे ३१ वे वर्ष होते. स्पर्धेच्या निमित्ताने ‘स्मृतिपर्ण’ या स्मरणिकेचे पाहुण्यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.ज्या शिक्षकांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये बालरंगभूमीसाठी योगदान दिले आणि जे निवृत्त झाले आहेत त्यांच्या कार्याची जाणीव ठेवून त्यांचा यथोचित सत्कार या वेळी करण्यात आला. या वर्षी अंबरनाथ येथील कांसाई विद्यालयाच्या माजी शिक्षिका रेखा अरुण मैड यांचा स्वानंदी टिकेकर हिच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना रेखा मैड यांनी, मला माझ्या या संपूर्ण कारकिर्दीत अनेक पुरस्कार मिळाले. पण मला ज्या गोष्टीची अत्यंत आवड आहे, त्या बालनाट्याच्या चळवळीचा एक भाग म्हणून रविकिरण संस्थेने माझे खारीचे योगदान लक्षात ठेवून जो मला सन्मान दिला त्यामुळे हा क्षण माझ्या स्मरणात राहील.प्रमुख पाहुणे म्हणून स्वानंदीने मनोगत व्यक्त करताना, माझी कलाकार म्हणून कारकिर्दीची सुरुवात रविकिरणच्याच बालनाट्य स्पर्धेतून झाली आणि याच स्पर्धेत मला अभिनयाचे पहिले पारितोषिक मिळाले होते. याच स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याचे भाग्य मला लाभले, यासारखा आनंद द्विगुणित करणारा क्षण दुसरा असणार नाही, अशा भावना व्यक्त केल्या. तिने मुलांना मार्गदर्शन करताना आपले अनुभव व्यक्त केले. तसेच मुलांनी नाटकच नव्हे तर जीवनात काहीही करताना आपले ध्येय निश्चित करावे व त्यासाठी प्रामाणिकपणे मेहनत घ्यावी, असे सांगितले. (प्रतिनिधी)