लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : वांद्रेत भरधाव वेगात आणि स्टंट करत मोटारसायकल पळवून चालक अनधिकृतपणे सट्टे लावत असल्याचे उघड झाले आहे. त्यानुसार खेरवाडी परिसरात ४८ दुचाकी ताब्यात घेतल्या असून अद्याप ७२ बाइकस्वारांवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खेरवाडी पोलिसांना ४ एप्रिल रोजी पहाटे २ वाजण्याच्या सुमारास वांद्रे पूर्वेला बाइकस्वार पोहोचल्याची माहिती मिळाल्यानंतर आणि अवैध शर्यतींमध्ये धोकादायकपणे त्यांच्या दुचाकी चालवल्याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. हे बाइकर्स बेकायदेशीरपणे रेसिंगमध्ये आणि त्यांच्या शर्यतींवर सट्टा लावत असल्याचे आढळून आले. एका अधिकाऱ्याने सांगितले की, त्यांच्या कृत्याने हे बाइकस्वार केवळ त्यांचा जीव धोक्यात घालत नव्हते, तर इतर वाहनचालकांचा आणि पादचाऱ्यांचाही जीव धोक्यात घालत होते, असेही पोलिस म्हणाले.
धोकादायक स्टंटचा व्हिडीओ व्हायरल
बाइकस्वारांवर आयपीसी, जुगार कायदा आणि मोटार वाहन कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे, असे अधिकाऱ्यानी सांगितले. बीकेसी पोलिसांनी फैय्याज कादरी (वय २४) या तरुणाला बाइकवर बसलेल्या दोन मुलींसह धोकादायक स्टंट केल्याप्रकरणी अटक केली आहे. त्याच्या स्टंटचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला. भरधाव वेगात वाहन चालवल्याने काही दिवसांपूर्वी वांद्रेच्या ४० फूट यू ब्रिजवरून कोसळून एका तरुणाचा मृत्यू झाला होता.
४८ बाइक जप्त
खेरवाडी पोलिसांच्या अखत्यारितील वांद्रे पूर्वेकडील बेकायदेशीर बाइक रेसिंगबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिस अधिकाऱ्यांच्या पथकाने तातडीने कारवाई केली आणि महामार्गावरील सुरक्षा वाढवून नाकाबंदी लावली. त्यानंतर पोलिस अधिकाऱ्यांनी बाइकस्वारांना पकडले आणि पोलिसांनी कारवाईत सुमारे ४८ दुचाकी जप्त केल्या. याप्रकरणी पोलिसांनी तब्बल ७२ दुचाकीस्वारांवर गुन्हा दाखल केला आहे. बेकायदेशीर बाइक शर्यतींमध्ये सहभागी असलेल्यांपैकी काहीजण शर्यतींवर सट्टा लावण्यातही सामील होते. त्यामुळे अवैध धोकादायक शर्यती आणखी वाढल्या, असे पोलिस तपासात उघड झाले आहे.