अकरावी प्रवेशासाठी रंगणार चुरस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2020 04:15 AM2020-07-30T04:15:40+5:302020-07-30T04:15:44+5:30
नामांकित महाविद्यालयात प्रवेश अवघड
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्याच्या राज्य शिक्षण मंडळाच्या जाहीर झालेल्या निकालानंतर आता अकरावी प्रवेशासाठी एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांना इतर मंडळांच्या विद्यार्थ्यांना टफ फाईट द्यावी लागणार आहे हे निश्चित झाले आहे.
एकीकडे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळासह, इतर मंडळांच्या दहावीच्या विद्यार्थ्यांची ९५ टक्क्यांहून अधिक गुण मिळविणाऱ्यांची संख्या ७० ते ८० हजारांच्या आसपास आहे. तर दुसरीकडे बुधवारी जाहीर झालेल्या राज्य शिक्षण मंडळाच्या निकालाच्या आकडेवारीनुसार दहावीच्या ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळविणाºया विद्यार्थ्यांची संख्या मुंबई विभागातूनच १४ हजारांवर आहे. त्यामुळे नामांकित महाविद्यालयांतील अकरावी प्रवेशासाठी आता राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना चांगलीच टक्कर द्यावी लागणार आहे.
यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक परीक्षा रद्द झाल्याने सीबीएसई आणि आयसीएसईचा निकालही ९५ टक्क्यांच्या पार लागल्याने, त्याचबरोबर दहावीच्या निकालातही यंदा वाढ झाल्याने नामवंत महाविद्यालयात मोठी चुरस रंगण्याची चिन्हे आहेत. मागील शैक्षणिक वर्षात अंतर्गत गुण रद्द करण्यात आले होते. यामुळे निकाल कमालीचा घसरला होता. यामुळे सरकारच्या त्या धोरणावर सर्वत्र टीका करण्यात आली होती. यानंतर राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशासाठी विशेष सूत्र तयार करावे लागले होते. यामुळे पुन्हा अंतर्गत मूल्यमापन सुरू करावे, अशी मागणी विद्यार्थी संघटना व पालकांनी केली होती.
यानंतर पुढील शैक्षणिक वर्षात ही मागणी मान्य करत अंतर्गत मूल्यमापन सुरू करण्यात आले. यामुळे यंदा ही निकालाची वाढ दिसून आली आहे.
सर्वच मंडळांच्या विद्यार्थ्यांची यंदा टक्केवारीत वाढ झाली आहे. त्यामुळे प्रवेशाची चिंता आहे. त्यामुळे महाविद्यालयांचे कटआॅफ वाढणार आहेत. मुलांना चांगले गुण मिळाले की त्यांची एका नामवंत महाविद्यालयाची आवड निर्माण होते. त्यामुळे ते त्यादृष्टीने प्रयत्न करतात. त्या महाविद्यालयातील जागा मिळवण्यासाठी मग स्पर्धा लागते. ही स्पर्धा यावेळी मोठ्या प्रमाणात होईल. त्यामुळे कटआॅफमध्ये वाढ होईल, असे महाविद्यालयीन प्राचार्यांचे म्हणणे आहे.
प्रवेशाच्या फेऱ्यांतही घट
यंदा अकरावी प्रवेशाच्या तरतुदींमध्येही अनेक बदल करण्यात आले आहेत. बायफोकलच्या शून्य फेरीसोबतच विशेष फेरीनंतरच्या प्रथम येणाºयास प्रथम प्राधान्य फेºयाही रद्द करण्यात आल्या आहेत. आवश्यकतेनुसार अतिरिक्त विशेष फेºयांचे आयोजन करता येणार असल्याने विद्यार्थ्यांची धाकधूक निश्चितच वाढली आहे. २६ जुलैपासून अकरावी प्रवेशाच्या नोंदणीला सुरुवात झाली असून, विद्यार्थ्यांना १ आॅगस्टननंतर अर्जाचा पहिला भाग भरता येणार आहे.
मंडळनिहाय
उत्तीर्णतेची टक्केवारी
मंडळ २०१९ २०२०
सीबीएसई ९९ ९८.५
आयसीएसई ९९.८५ ९९.८३
राज्य मंडळ ७७.०४ ९६.७२