जातपडताळणीसाठी उमेदवारांची धावपळ
By admin | Published: November 5, 2014 10:05 PM2014-11-05T22:05:20+5:302014-11-05T22:05:20+5:30
कर्जत तालुक्यात अतिशय महत्त्वाच्या आणि मोठ्या असलेल्या नेरळ ग्रामपंचायतीची येत्या २३ नोव्हेंबरला सार्वत्रिक निवडणूक होत आहे
कर्जत : कर्जत तालुक्यात अतिशय महत्त्वाच्या आणि मोठ्या असलेल्या नेरळ ग्रामपंचायतीची येत्या २३ नोव्हेंबरला सार्वत्रिक निवडणूक होत आहे. त्यासाठी नेरळमधील सर्वच राजकीय पक्षांनी आपली मोर्चेबांधणी सुरु केली आहे. मात्र इच्छुक उमेदवारांना आरक्षित जागेसाठी नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी लागणारे दाखले मिळवण्यासाठी मोठी धावपळ करावी लागत आहे.
नेरळ ग्रामपंचायतीच्या एकूण १७ जागांसाठी निवडणूक होत आहे. त्यामधील ९ जागा आरक्षणात असून उर्वरित ८ जागा सर्वसाधारण आहेत. यामध्ये अनुसूचित जमातीसाठी ३ जागा, अनुसूचित जातीकरिता १ जागा, तर ओबीसीकरिता ५ जागा राखीव आहेत. नेरळ ग्रामपंचायतीमध्ये एकूण सहा प्रभागनिहाय आरक्षण आहेत. त्यामुळे प्रत्येक पक्षातील इच्छुकांची संख्या देखील मोठी आहे. त्यांची या आरक्षित जागेवर उभे राहण्यासाठी लागणाऱ्या दाखल्यांची जुळवाजुळव करताना मोठी दमछाक होत आहे. मुख्यत: जात पडताळणीकरिता उमेदवारांना कर्जत तहसील कार्यालयातून अलिबाग जिल्हाधिकारी कार्यालय आणि नंतर कोकण भवन असा प्रवास करून दाखले मिळवावे लागत आहेत. ते दाखले मिळवण्यासाठी देखील उमेदवारांना हेलपाटे मारावे लागत आहेत.
नामांकन अर्ज दाखल करण्याची ८ नोव्हेंबर ही शेवटची तारीख आहे. त्यामध्ये देखील गुरु नानक जयंतीची शासकीय सुटी आहे. त्यामुळे उमेदवारांची जातपडताळणी दाखला मिळवण्यासाठी आता मोठी दमछाक होणार आहे. निवडणुकीच्या काळात अपेक्षित दाखले मिळण्यासाठी सरकारने एकाच ठिकाणी सर्व दाखले मिळतील, अशी व्यवस्था करावी, अशी मागणी आता पुढे येत आहे.
नेरळ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचे आरक्षण याआधीच जाहीर झाले आहे. सरपंच पदाकरिता ओबीसी महिला असे आरक्षण आहे, त्यामुळे सर्वच राजकीय पक्षातील नेते मंडळींनी आपल्या पत्नी आणि जवळच्या नातेवाईकांना तिकीट देवून नेरळ ग्रामपंचायतीची सत्ता आपल्या हाती ठेवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.