यदु जोशी, लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक २८ डिसेंबरला होणार असून काँग्रेसमध्ये या पदासाठी रस्सीखेच सुरू असतानाच काही विद्यमान मंत्र्यांनी अध्यक्ष करून आमचा बळीचा बकरा कशाला बनविता, अशी भूमिका घेतल्याचेही समजते.
अध्यक्षपदासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, भोरचे (जि. पुणे) आमदार संग्राम थोपटे, आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांची नावे चर्चेत आहेत. पश्चिम महाराष्ट्रातून काँग्रेसचे एकही कॅबिनेट मंत्री नाहीत म्हणून यावेळी पश्चिम महाराष्ट्राला अध्यक्षपदाची संधी द्यावी, अशी आग्रही मागणी पुढे येत आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे ओबीसी आहेत. संतुलन साधण्यासाठी अध्यक्षपद हे मराठा नेत्याकडे द्यावे, असाही एक सूर आहे. त्यादृष्टीने बाळासाहेब थोरात यांचे नाव घेतले जात असले तरी ते या पदासाठी इच्छुक नसल्याचे म्हटले जाते. पाडवी यांच्याबाबतही तसेच आहे. अन्य बडे मंत्रीही आपल्या गळ्यात अध्यक्षाची माळ पडू नये म्हणून प्रयत्नांत आहेत.
पृथ्वीराज चव्हाण आणि थोपटे या दोघांच्याही नावांना राष्ट्रवादीचा विरोध असल्याची चर्चा आहे. चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांनी राष्ट्रवादीला अडचणीत आणण्याची भूमिका घेतली होती तसेच ते पवार विरोधक मानले जातात, हे कारण दिले सांगितले जात आहे. पुणे जिल्ह्यातील काँग्रेसच्या नेत्याला विधानसभेचे अध्यक्षपद दिले तर जिल्ह्यात काँग्रेसचे प्राबल्य वाढू शकते, म्हणून थोपटे यांच्या नावाला विरोध असल्याची माहिती आहे. चव्हाण की थोपटे असा पर्याय दिला गेला तर राष्ट्रवादी कोणत्या नावास सहमती देईल, याबाबत उत्सुकता असेल.
काँग्रेसमध्ये शहकाटशहाचे राजकारण नेहमीच चालत आले आहे. मंत्री असलेल्या एखाद्या नेत्याला अध्यक्षपद देऊन मंत्रिपदी दुसऱ्याला संधी द्यायची, असेही प्रयत्न होत आहेत. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना मंत्रिपदही हवे असल्याची चर्चा बऱ्याच दिवसांपासून आहे.
अधिसूचना निघाली आता नावाची प्रतीक्षा
विधानसभा अध्यक्षपद निवडीची पद्धत बदलण्याची अधिसूचना शुक्रवारी शासनाने जारी केली. त्यानुसार आवाजी मतदानाने ही निवड होईल. आतापर्यंतच्या गुप्त मतदान पद्धतीला फाटा देण्यात आला आहे. आता काँग्रेसकडून उमेदवाराचे नाव जाहीर होण्याची प्रतीक्षा आहे.
... तर भाजप काय करणार?
निवडणूक बिनविरोध व्हावी, हा महाविकास आघाडीचा प्रयत्न असेल तसे झाले तर भाजपकडून विधानसभा उपाध्यक्षपद मागितले जाऊ शकते. अर्थात सध्या राष्ट्रवादीकडे (नरहरी झिरवाळ) हे पद असल्याने भाजपची मागणी मान्य केली जाणार नाही. १२ आमदारांचे निलंबन मागे घेतले गेले तर भाजपकडून अध्यक्षांची निवडणूक बिनविरोध करण्यास सहकार्य मिळेल, अशीही माहिती आहे.
निलंबन मागे घ्या : फडणवीस
विरोधी पक्षाला विश्वासात न घेताच निवडणूक घेतली जात असल्याचा आरोप सुधीर मुनगंटीवार यांनी केला. त्यावर वृत्तपत्रांमधील बातम्यांवर जाऊ नका, असा टोला मंत्री अनिल परब यांनी हाणला. भाजपच्या १२ सदस्यांचे निलंबन मागे घ्या, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.