Join us  

रेसकोर्स: भाडे वसुलीसाठी पालिकेचा आटापिटा; आठवडाभरात पैसे न आल्यास क्लबला पुन्हा पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2023 7:26 AM

रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबला महालक्ष्मी येथील रेसकोर्सची जागा १९१४ साली भाडे करारावर देण्यात आली होती.

मुंबई :  महालक्ष्मी येथील रेसकोर्सचा वापर करणाऱ्या टर्फ क्लबकडून भाड्याचे पैसे लवकरात लवकर वसूल व्हावेत, यासाठी पालिकेचा आटापिटा सुरू आहे. ५ कोटी ९९ लाख रुपये वसूल व्हावेत यासाठी टर्फ क्लबकडून पालिका हमीपत्र लिहून घेणार असून, तसे पत्र पालिकेकडून क्लबला यापूर्वीच पाठवण्यात आले आहे. या पत्राला १० दिवस उलटून गेले असून पालिका पुढच्या आठवड्यात क्लबला पुन्हा स्मरणपत्र धाडणार आहे.

रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबला महालक्ष्मी येथील रेसकोर्सची जागा १९१४ साली भाडे करारावर देण्यात आली होती. हा भाडे करार २०१३ साली संपला असून या भूखंडावर पालिकेने थीम पार्क उभारण्याची योजना आखली आहे. तसा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात आला आहे.  कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडू नये, यासाठी हमीपत्राची आठवण करून देण्यासाठी पहिल्या आठवड्यात क्लबला पत्र पाठवण्यात आले आहे. त्यास १० दिवस होऊन गेले. आणखी सात दिवस पालिका वाट पाहून त्यानंतर पुन्हा एकदा स्मरणपत्र क्लबला पाठवले जाईल, अशी माहिती पालिकेच्या अधिकाऱ्याने दिली.

पुन्हा तेवढेच भाडे आकारणार नाही!

क्लबने भाडे जरी भरले तरी कराराचे नूतनीकरण झाले असा त्याचा अर्थ होत नाही. यदाकदाचित कराराचे नूतनीकरण झालेच तर भाडे ५६ लाख रुपयांप्रमाणे आकारले जाणार नाही, त्यात निश्चितच वाढ केली जाईल, अशी माहिती पालिकेच्या अधिकाऱ्याकडून देण्यात आली.

असे भाडे वाढले!

१९६४ साली क्लबचा भाडेकरार ३० वर्षांसाठी वाढवला. १९९४ साली पुन्हा १४ वर्षांसाठी हा वाढवण्यात आला. त्यावेळी वर्षाला १९ लाख रुपये असा करार क्लबबरोबर करण्यात आला होता. तसेच भाड्यात वर्षाला २ लाखांची वाढ करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. क्लबने २०१३ साली करार संपताना ५६ लाख भरले. मात्र अजूनही जागेचा ताबा सोडलेला नाही, तेव्हापासून ते आजतागायत ही रक्कम ५ कोटी ९९ लाख व त्याव्यतिरिक्त व्याजाची रक्कम वेगळी अशी ६ कोटींहून अधिक झाली आहे.

टॅग्स :मुंबई महानगरपालिकामहाराष्ट्र सरकार