मुंबई :
सण, उत्सव आणि मिरवणुकीत कार्यकर्त्यांमध्ये सुरू असलेल्या कुरघोडीत घातक लेझर प्रकाशझोताचा सर्रास वापर होत आहे. लेझर बीममुळे तिघांच्या डोळ्याला दुखापत होऊन दृष्टी गेली आहे. त्यावर बंदीची मागणी करत लेझरविरोधात जनहित याचिका दाखल आहे. मात्र, या लेझर बीम उत्पादनाची शासकीय यंत्रणांकडे ठोस नोंदणी आणि माहिती नाही तरीसुद्धा बाजारात लेझर येते कोठून? कार्यकर्त्यांना ते सहज कोण मिळवून देतात? याचा याचिकाकर्त्यांकडून अभ्यास सुरू असून लेझरचा छुप्या मार्गाने खरेदी-विक्री होत आहे. या सर्वामागे विदेशी रॅकेट कार्यरत असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे.
याचिकाकर्ते आणि अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे संघटक विजय सागर आणि ॲड. सत्या मुळ्ये यांनी काही उद्योग नोंदणी विभाग, जिल्हाधिकारी, पोलिस, प्रदूषण नियंत्रण, पर्यावरण अशा संबंधित विभागांकडे लेझर उत्पादन, त्याच्या वापर परवानगीची माहिती विचारली होती. मात्र, कोणत्याही शासकीय यंत्रणेकडे ठोस असे उत्तर मिळू शकलेले नाही. लेझर उत्पादनाची शासनाकडे कुठे नोंद होते ? वापराच्या मर्यादा काय ? विक्रीचे नियम काय ? कोणास परवानगी मिळते ? याची यंत्रणांकडे उत्तरे नाहीत. असे घातक लेझर मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबादसारख्या शहरात विक्री कोण करते ?, कार्यकर्त्यांना ते सहज कसे मिळते ? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने पुढे येत आहेत. ग्राहक पंचायतीकडून बाजारात माहिती घेतली असता यामागे मोठे रॅकेट कार्यरत असून विदेशी देशाचा छुपा हस्तक्षेप दिसून असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
आतापर्यंत तिघांनी गमावली दृष्टी विसर्जन मिरवणुकीत आणि राजकीय कार्यक्रमात कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढवण्यासाठी तसेच एकमेकांवर कुरघोडी करताना घातक लेझर बीमचा वापर होत आहे. ग्रामीण भागात असे प्रकार वाढले आहेत. विसर्जन मिरवणुकीत लेझरच्या वापरामुळे तीन जणांच्या डोळ्याला दुखापत झाली असून त्यांची दृष्टी गेली.
विमानाला ही धोका लेझरचा वापर नुसता मानवी शरीरावर परिणाम करीत नाही. तो इतर गोष्टीवर सुद्धा परिणाम साधतो. आकाशात उडत असलेल्या विमानाला सुद्धा लेझर बीमचा धोका असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे.
मुळात लेझरचे मापन करणारी कोणतीही शासकीय यंत्रणा किंवा संस्था नाही. लेझरला परवानगी आणि नियंत्रण ठेवणारी नियमावली नाही. ज्याप्रमाणे ड्रोनचा वापर चुकीचा होत असल्याने याबाबत कायदा करावा लागला. लेझरसुद्धा छुप्या पद्धतीने पुरवले जात आहे. यावरही निर्बंध आणावेत. - ॲड. सत्या मुळ्ये